अटल सेतूवरून उतरणाऱ्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणा, शिवसेनेची एमएमआरडीएकडे मागणी
अटल सेतूवरून शिवडीतील गाडी अड्डा परिसरात उतरणाऱ्या भरधाव गाड्यांमुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे अपघात टाळण्यासाठी अटल सेतूवरून उतरणाऱ्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने एमएमआरडीएकडे केली आहे. तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
गाडी अड्डा नाक्यावर चार दिवसांपूर्वी वाहनाने दिलेल्या धडकेत एक स्थानिक रहिवासी गंभीर जखमी झाला होता. या परिसरात वारंवार होणाऱया अपघातांचे कारण गाड्यांचा वेग असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत अपघातस्थळाची पाहणी केली. पडवळ यांनी तेथील भयावह स्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. येथील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग करता येईल का याची तांत्रिक तपासणी करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. तसे निवेदन एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पुढील उपाय करण्याचे आश्वासन
- गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी 7 दिवसांत उपाययोजना करण्यात येतील
- पादचारी पूल किंवा भुयारी मार्गासाठी तांत्रिक सल्लागार नेमून अहवाल घेण्यात येईल.
Comments are closed.