उद्याची शेती – शेतकऱ्यांचा मालकीचा जागतिक ब्रँड
>> रितेश पोपळघट, [email protected]
जगातील बाजारात ‘किवी’ फळाचा वाढता ट्रेंड हा एक कॉर्पोरेट सहकाराचा यशस्वी प्रवास आहे. ‘झेस्प्री’ ही न्यूझीलंडमधील ‘कॉर्पोरेट सहकारी’ संस्था शेतकरी, संशोधन, सप्लाय चेन, मार्केटिंग आणि ग्राहक यांना जोडणारी एक आदर्श समन्वित प्रणाली बनलेली आहे.
आज भारताच्या कोणत्याही फळ पोत्याकडे आपण गेलो की, अनेक विदेशी फळे सर्रास मिळतात. प्रामुख्याने न्यूझीलंड आणि काही इतर देशांमध्ये पिकणारे, पण नुकत्याच भारतात 5,400 हजार कोटींचे पी मूल्य गाठलेले चायनीज गुसबेरी म्हणजेच ‘किवी’ फळ सध्या खूप जास्त चर्चेत आहे.
जगातील बाजारात ‘किवी’ फळाचा वाढता ट्रेंड हा एक कॉर्पोरेट सहकाराचा यशस्वी प्रवास आहे, ज्याने शेतकऱ्यांना ‘मूल्यसाखळी’तील नफा खऱ्या अर्थाने मिळवून दिला. तो शेतकऱ्यांचा मालकीचा जागतिक ब्रँड म्हणजे ‘झेस्प्री’. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार झाल्यामुळे न्यूझीलंडचे वैज्ञानिक किवी फळाची लागवड वाढवणार आहेत आणि त्यासाठी कामदेखील सुरू केले आहे.
जागतिक कृषी क्षेत्रात काही मॉडेल्स अशी आहेत जी केवळ उत्पादनापुरती मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण मूल्यसाखळीवर नियंत्रण ठेवत जागतिक ब्रँड निर्माण करतात. न्यूझीलंडमधील ‘झेस्प्री’ ही अशीच एक ‘कॉर्पोरेट सहकारी’ संस्था आहे, जी आज केवळ ‘किवी’ हे फळ विकणारी कंपनी नसून शेतकरी, संशोधन, सप्लाय चेन, मार्केटिंग आणि ग्राहक यांना जोडणारी एक आदर्श समन्वित प्रणाली बनलेली आहे.
झेस्प्रीचे विशेष वैशिष्टय़ ‘कॉर्पोरेटाइज्ड कोऑपरेटिव्ह’ म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने चालवलेली सहकारी संस्था. आज संपूर्ण ‘शेतकऱ्यांच्या मालकीची’ संस्था असूनही आज जागतिक पातळीवर ‘किवी’ फळातील प्रीमियम ब्रँड म्हणून ओळखली जाते. झेस्प्रीने शेतकरी संघटन, पोस्ट-हार्वेस्ट व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग आणि सप्लाय चेन यांचा वापर करून जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे याची ही स्टोरी.
झेस्प्रीचा जन्म न्यूझीलंडमधील ‘किवी’ फळ उत्पादकांच्या अडचणीतून निर्माण झाला. 1990 च्या दशकात किवी फळ उत्पादकांना जागतिक बाजारात मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा, किंमत अस्थिरता आणि गुणवत्ता समस्या यांचा सामना करावा लागत होता. त्या काळात प्रत्येक शेतकरी किंवा पी करणाऱ्या स्थानिक कंपनी स्वतंत्रपणे निर्यात करत होत्या, ज्यामुळे बाजारात एकसंध ब्रँड तयार होत नव्हता. या सगळ्या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक ‘सिंगल-डेस्क मार्केटिंग’ मॉडेल स्वीकारले, ज्यातून झेस्प्रीची स्थापना झाली. या मॉडेलमध्ये सर्व शेतकरी आज आपला माल झेस्प्रीमार्फतच विकतात, ज्यामुळे बाजारात एकसंध गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ब्रँड तयार झाला.
झेस्प्रीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची ‘शेतकरी मालकीची रचना’ आहे. ही संस्था पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीची आहे आणि त्यामुळे कंपनीचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून घेतले जातात. यामुळे उत्पादनापासून ते पीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांचा सहभाग असतो. या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादनाचा पैसा मिळत नाही, तर संपूर्ण ‘मूल्यसाखळीतून मिळणारा नफा’देखील मिळतो.
झेस्प्रीने ‘किवी’ फळ उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत उच्च दर्जाची ‘मानके’ तयार केलेली आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘ग्रोवर स्टँडर्ड्स’ बनवून बाग व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, पर्यावरणीय काळजी आणि सिंचन प्रणाली विकसित करून प्रत्येक फळाचा आकार, चव, रंग, पोषणमूल्य आणि टिकाऊपणा यावर कठोर नियंत्रण ठेवले जाते. या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीने ‘संशोधन’ आणि ‘नवकल्पना’ यावर मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उदाहरणार्थ- सन-गोल्ड, ग्रीन आणि रुबीरेड या विविध प्रकारांतील नवीन संशोधित वाणांची निर्मिती ही ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार केली आहे.
पोस्ट-हार्वेस्ट (काढणी पश्चात) व्यवस्थापन हे झेस्प्रीच्या यशाचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. शेतातून फळ काढल्यानंतर त्याचे वर्गीकरण, ग्रेडिंग, पॅकिंग आणि साठवणूक या सर्व प्रािढया अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केल्या जातात. प्रत्येक फळाला एक विशिष्ट ओळख दिली जाते, ज्यामुळे ते कोणत्या शेतातून आले आहे हे सहज ओळखता येते. ट्रेसेबिलिटी प्रणालीचा वापर करून झेस्प्रीने प्रत्येक किवी फळाच्या पॅकवर बारकोड लावण्याची प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे फळाचा संपूर्ण प्रवास शेतापासून ग्राहकापर्यंत ‘ट्रक’ करता येतो. ही प्रणाली केवळ गुणवत्ता नियंत्रणासाठीच नाही, तर उत्पादनाकरिता लोकांच्या मनात विश्वास तयार करणारी ठरली आहे.
झेस्प्रीच्या ‘सप्लाय चेन’ व्यवस्थापनात एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘जागतिक पुरवठा मॉडेल’ आहे. ‘झेस्प्री ग्लोबल सप्लाय’ नामक अशी व्यवस्था तयार केली आहे की, ज्यामुळे वर्षभर जगभरातील बाजारात किवी फळ उपलब्ध राहील. यासाठी न्यूझीलंडच्या हंगामाबरोबरच इटली, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स या इतर देशांतील शेतकरी वर्गाला सोबत घेऊन उत्पादन केले जाते.
झेस्प्रीच्या यशामागे ‘एकात्मिक विपणन प्रणाली’ असून कंपनीने आपल्या उत्पादनाला केवळ फळ म्हणून न पाहता आरोग्यासाठी ‘फायबर’ आणि ‘जीवनसत्व क’ यांचा चांगला स्रोत असल्याने ‘हेल्दी लाईफस्टाईल प्रॉडक्ट’ म्हणून बाजारात सादर केले.
जागतिक बाजारपेठेतील ‘बदलत्या ट्रेंड्स’चा विचार करून झेस्प्रीने आपली रणनीती सतत अद्ययावत ठेवली आहे. मध्यमवर्गीय लोकसंख्येची वाढ, आरोग्याविषयी जागरूकता आणि ई-कॉमर्सचा वाढता वापर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन झेस्प्रीने त्यादृष्टीने संधी निर्माण केल्या. झेस्प्रीचे संपूर्ण मॉडेल हे ‘संपूर्ण मूल्यसाखळीवरील नियंत्रण’वर आधारित आहे. ही एका छताखाली चालणारी एकात्मिक पद्धतच झेस्प्रीला इतर स्पर्धकांपासून आज वेगळे ठरवत आहे.
शेतकरी संघटन, गुणवत्ता नियंत्रण, ट्रेसेबिलिटी, जागतिक पुरवठा साखळी आणि मजबूत ब्रँडिंग या सर्व घटकांचा योग्य समन्वय केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मालकीचा जागतिक स्तरावर ‘प्रीमियम ब्रँड’ कृषी क्षेत्रातही निर्माण करता येतो, हे झेस्प्रीने सिद्ध करून दाखविले आहे.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)
Comments are closed.