नायगाव बीडीडी पुनर्विकास – रहिवाशांचा विरोध धुडकावत ‘म्हाडा’ची लॉटरीची तयारी; पार्किंग, भाडेवाढचा निर्णय न झाल्याने नाराजी
एका घराला एक पार्किंग, भाडेवाढ या प्रमुख मुद्दय़ांवर कोणताही ठोस निर्णय जाहीर न करताच म्हाडाने नायगाव बीडीडी चाळीच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन घरांच्या लॉटरीची तयारी सुरू केली आहे. याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोमवारी होणाऱ्या या लॉटरीचा निषेध नोंदवण्याच्या तयारीत रहिवासी आहेत.
जुनी बीडीडी चाळ क्रमांक 1 ते 7 व 13 ते 19 येथील रहिवाशांची नवीन घराची लॉटरी म्हणजे नवीन टॉवरमध्ये कोणाला कोणत्या मजल्यावर घर मिळेल याचा तपशील सांगण्याची तयारी म्हाडाने सुरू केली. सोमवारी ही लॉटरी होणार असल्याची नोटीस म्हाडाने प्रत्येक इमारतीत चिटकवली. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण जोपर्यंत एका घराला एक पार्किंग जाहीर होत नाही तोपर्यंत घरे रिकामी करू नका, असे जाहीर आवाहन स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी रहिवाशांना केले होते.
तसेच सध्या या विभागात घर भाडय़ाने घेण्याचा आकडा 35 ते 40 हजार रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी म्हाडाने 25 हजार रुपये प्रति महिना भाडे निश्चित केले होते. यात वाढ करावी, अशी विनंती म्हाडाला रहिवाशांनी केली होती. तसे निवेदन म्हाडाला देण्यात आले होते. या दोन प्रमुख मागण्यांवर काहीही भाष्य न करताच म्हाडाने थेट नवीन घरांची लॉटरी जाहीर करणे म्हणजे रहिवाशांची घोर फसवणूक आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय?
पहिल्या टप्प्यातील नवीन घरांचा चावी वाटपाचा कार्यक्रम मार्च महिन्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका घराला एक पार्किंग करण्याच्या मागणीवर भाष्य केले होते. एका घराला एक पार्किंग ही मुंबईची गरज आहे. याबाबत मी आणि उपमुख्यमंत्री शिंदे बसून तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. हा तोडगा जाहीर न करताच म्हाडा लॉटरी काढूच कशी शकते, असा सवाल काही रहिवाशांनी केला.
टॉवरबाबत संभ्रम
येथील काही इमारतींनी पुनर्विकासातील नवीन टॉवरसाठी म्हाडा व लोकप्रतिनिधींकडे विनंती केली आहे. अमूकच टॉवर मिळावा असे काही इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यावरही अद्याप प्रशासनाकडून काहीच स्पष्टता दिली गेलेली नाही. त्यामुळे येथे संभ्रमाचे वातावरण आहे. टॉवर निश्चितीसाठी किमान आमचे म्हणणे ऐकावे, असे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.
Comments are closed.