संजय शिरसाटांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, देवेंद्र फडणवीसांकड

संजय शिगसिटवरील रोहित पवार: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केलाय. संजय शिरसाठ यांनी 5 हजार कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमीपुत्रांशी गद्दारी केली आहे. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स नेमावी किंवा निवृत न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, गँग्स ऑफ गद्दार या विषयावर मी बोलणार आहे. ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्या विरोधात इंग्रजांना मदत केली. त्याबदल्यात त्यांना चार हजार पेक्षा जास्त रोहा, पनवेल, अलिबाग या भागातील जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली. 1959 साली बिवलकर कुटुंबाने सिलिंग कायद्यातून स्वतःला वाचवून घेतलं आणि चार हजार एकर जमीन वाचवली. मात्र 1971 साली ही जमीन सरकारकडे जमा झाली. 1990 साली त्यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ती जमीन माघारी देण्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर कोर्टात हा विषय सुरू होता.

शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला

1971 मध्ये नवी सिडकोने विविध कामांसाठी जमिनी घेण्याचा निर्णय घेतला. 1983 साली या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. 1987 मध्ये महसूल विभागाला हाताशी धरून बिवलकर कुटुंबाने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. 1990 साली शरद पवार, दी. बा. पाटील यांनी साडे बारा टक्के योजना आणली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला. त्यावेळी बिवलकर यांनी सरकारकडे आपली जमीन आहे. त्याबदल्यात साडे बारा टक्के योजनेचा फायदा द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी एमडी अनिल डिग्गीकर होते. त्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आलेल्या तीन एमडीनी बिवलकर कुटुंबाची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 साली विजय सिंघल एमडी झाले. त्यांच्याकडे ही जमीन ताब्यात देण्याची मागणी करण्यात. त्यांनी डोकं चालवलं आणि सिडको एमडी नेमण्याची मागणी केली. त्यानुसार ज्यांच्या घरात पैशांची बॅग सापडली त्यांना अध्यक्ष बनवले. मंत्री संजय सिरसाट यांनी जवळपास 61000 स्के मीटर जमीन बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.

देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी

संजय शिरसाट यांनी ते अध्यक्ष असताना हा निर्णय घेतला आहे. हा सरळसरळ भ्रष्टाचार केला आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. झुडपी जंगल जमीन पुन्हा माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बिवलकर कुटुंबाची देखील जमीन येते. ती तत्काळ माघारी घ्यायला हवी. 20 तारखेला सिडकोवर भव्य मोर्चा घेऊन मी जाणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्चा होईल. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा.

पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

संजय राऊत यांच्याशी देखील माझे याविषयी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्ही सोबत आहोत, असं सांगितल आहे. काँग्रेस देखील आंदोलनात सोबत असणार आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. याबदल्यात शिरसाट यांनी आर्थिक व्यवहार केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा थेट सहभाग या भ्रष्टाचारात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला आहे.

स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा

रोहित पवार पुढे म्हणाले की, इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा. जर शिरसाट यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि उत्तर द्यावं. संजय शिरसाट यांना 15 दिवस सिडको अध्यक्षपदी नेमून होताच त्यांनी 150 एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली. त्यानंतर सरकार आल्यावर उर्वरित जमीन बिवलकर यांना देण्याचा प्रयत्न होता. संजय शिरसाट यांना 100 कोटी रुपयांचा मलिदा मिळाला असेल अशी आमचा संशय आहे. त्यांच्या पक्षाला सुद्धा चारशे ते पाचशे कोटी मिळाले असणार आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पेशल टास्क फोर्स नेमा किंवा निवृत न्यायाधीशांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. आता या आरोपांवर संजय शिरसाट काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते; गोपीचंद पडळकरांचा पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.