सुनेत्रा काकींविरोधात एकही उमेदवार उभा राहणार नाही याची दक्षता घ्या : रोहित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनासंदर्भातील पुरावे सादर केले. यानंतर रोहित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा काकींचं यांचं अभिनंदन करतो, असं रोहित पवार म्हणाले.

आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे असलेली पदं ती सुनेत्राकाकींना मिळाली पाहिजे. उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आहेत, त्याबद्दल अभिनंदन करतो.  पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकी लढत असताना, एक कार्यकर्ता म्हणून, एक पुतण्या म्हणून सर्वच पक्षांना विनंती करेल की एक सुद्धा व्यक्ती हा तिथं सुनेत्रा काकींच्या विरोधात उभा राहणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. सुनेत्राकाकींची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशी आमची भावना आणि भूमिका आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

अजितदादा त्यांच्या बद्दल काय बोलले ते आम्हाला माहिती : रोहित पवार

पत्रकारांनी सुनील तटकरेंसदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, हे जे बोलणारे महाशय आहेत, त्यांच्याबद्दल मी खूप काही बोलणार नाही. दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काय अकाऊंट होते, त्या अकाऊंटच्या माध्यमातून कोणाची घरची बिलं दिली गेली. त्याच्याबरोबर ब्यूटी पार्लरची कोणाची बिलं दिली गेली. हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंगमध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयांचं बिल आलं? कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं की ते पक्षाच्या भूमिकेसाठी कुठंही विमानाने किंवा हेलिकॉप्टरनं गेले नाहीत, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. आज त्या अकाऊंटमध्ये काय परिस्थिती आहे. कशा पद्धतीनं अकाऊंटचा गैरव्यवहार झाला, त्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे हे वेगळं सांगणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

शपथविधी चौथ्या दिवशी झाला, पवार परिवारातील एक व्यक्ती म्हणून सांगतो, पक्ष वेगळे असले तरी, सुनेत्रा काकींची कुठंही इच्छा नव्हती की शपथविधी चौथ्या दिवशी झाला पाहिजे. पण त्यांच्या पक्षातील अनुभवी मार्गदर्शक आहेत जे आज भाषणं करत आहेत, त्यांनी दबाव आणला, सुनेत्रा काकींना तुम्ही चौथ्या दिवशी शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. या पदाचा अनुभव कदाचित नसल्यानं काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी झाला. टीका सुनेत्रा काकींवर होते, असं म्हणनार नाही पण ज्या लोकांनी सुनेत्राकाकींना चुकीचं मार्गदर्शन केलं अशा नेत्यांवर लोकं टीका करतात हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पर्व संपलंय असं जर कोणी म्हणत असतील तर चुकीचं आहे. अजित पर्व संपणार नाही, अजित पर्व लोकांच्या ह्रदयात जाऊन बसलेलं आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.