श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेची भालाफेकीत कमाल! 92.62 मीटरचा थ्रो करत नीरज चोप्राला टाकले मागे
रुमेश थरंगा पाथिरागेने गुरूवारी (4 जून) रोम डायमंड लीगमध्ये 92.62 मीटर भाला फेकून सर्वांना चकित केले. हा 23 वर्षीय श्रीलंकन खेळाडू पुरुषांच्या भालाफेकीत 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा केवळ चौथाच आशियाई खेळाडू ठरला आहे. त्याचा चायनीज तैपेईचा चेंग चाओ त्सुन (91.36 मीटर), पाकिस्तानचा अर्शद नदीम (92.97 मीटर) आणि भारताचा नीरज चोप्रा (90.23 मीटर) यांच्या खास क्लबमध्ये समावेश झाला आहे.
रुमेशची ही फेक या स्पर्धेच्या इतिहासातील 21 वी सर्वोत्तम ठरली आहे. या यादीत अव्वल स्थानी नीरजचे माजी प्रशिक्षक जॅन झेलेझ्नी आहेत. त्यांनी 1996 मध्ये 98.48 मीटर भाला फेकला होता. तसेच रुमेशने अनेक नवे विक्रमही रचले.
रुमेशचा 92.62 मीटर थ्रोमुळे झालेले विक्रम
हा श्रीलंकेचा एक नवा राष्ट्रीय विक्रम.
पुरुषांच्या भालाफेकीतील 2026 मधील जागतिक सर्वोत्तम कामगिरी.
रोम डायमंड लीग स्पर्धेचा विक्रम, आशियाई व्यक्तीने केलेला इतिहासातील दुसरा सर्वोत्तम थ्रो (आशियाई सर्वकालिन यादीत, रुमेशचा थ्रो आता केवळ अर्शदच्या 2024 मधील सुवर्णपदक विजेत्या 92.97 मीटरच्या विक्रमाच्या मागे).
पुरुषांच्या भालाफेकीच्या इतिहासातील 21 वा सर्वोत्तम थ्रो.
रोममध्ये रुमेश चांगल्या लयीत दाखल झाला होता. त्याने मार्चमध्ये दियागामा येथे 89.37 मीटरचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. या स्पर्धेत अर्शद आणि नीरज दोघेही अनुपस्थित होते, त्यामुळे रुमेशने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नातच 92.62 मीटरचा विक्रमी थ्रो केला. या थ्रोमुळे त्याने चेंग आणि नीरजला मागे टाकले आहे. त्यानंतर त्याचे चार फाऊल झाले. माजी विश्वविजेता ऍंडरसन पीटर्स 83.89 मीटरसह दुसऱ्या स्थानी राहिला. यावरून इतर नऊ खेळाडूपैकी एकानेही 90 मीटरचा टप्पा गाठला नाही.
या स्पर्धेत भारताच्या सचिन यादवने पदार्पण केले. गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशीपमध्ये चौथ्या स्थानी राहिलेल्या सचिनसाठी रोम डायमंड लीगची सुरूवात कठीण ठरली. त्याला 79.18 मीटरची कामगिरी करता आली. त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 86.27 मीटर आहे.
रुमेश पाथिरागे नेमका कोण?
बहुतेक श्रीलंकन युवांप्रमाणे रुमेशलाही आधी क्रिकेटची आवड होती. 18 वर्षांखालील गटातच तो ताशी 134 किमी वेगाने चेंडू फेकतो होता. कोलंबोच्या सेंट पीटर्स कॉलेजकडून खेळलेल्या आपल्या एकमेव स्पर्धात्मक सामन्यात त्याने पाच विकेट्स घेत अर्धशतकी खेळीही केली होती. त्याने 2017 मध्ये थाळीफेक आणि गोळाफेक खेळाडू असलेल्या आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीचा सराव करण्यास सुरूवात केली.
Comments are closed.