तू काय आपटून मारशील? तुला आम्हीच आपटून मारू; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा निशिकांत दुबेंवर
Rupali Thombare on Nishikant Dubey : भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. दुबे यांनी दोघांवर “घाणेरडं राजकारण” करत असल्याचा आरोप केला असून, “तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असाल, तर माहीम दर्ग्यावर जा आणि तेथील उर्दू भाषिकांवर कारवाई करून दाखवा,” असं खुले आव्हान त्यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. तर “तुमच्या घरात सिंह असतो, असं तुम्ही म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि दाखवून देऊ,” अशा शब्दांत त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी निशिकांत दुबेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, दुबे जरी आमच्या मित्रपक्षाचे भाजपचे खासदार असले तरी सुद्धा त्यांनी मराठीबद्दल बोलू नये. तुम्ही तुमची भाषा झारखंडमध्ये वापरायची, महाराष्ट्रात वापरायची नाही. मराठी माणूस बाहेर का पडेल? मराठी माणूस तुमच्या राज्यात जेव्हा काम करतो तेव्हा त्याची ती कर्मभूमी असते. अमराठी आहेत त्यांनी नक्की यावं, मराठी शिकवी आणि भाषेचा सन्मान करावा. भाजपला विनंती आहे की, बेताल बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. भाजपच्या या खासदारांना आवरा. जमत नसेल तर बिस्तार उचला आणि निघा, असे त्यांनी म्हटले.
तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू
रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या की, तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू, आपण झारखंडचे आहोत म्हणून बोलू, असं त्याला वाटलं असेल. मारायची गरज दुबे सारख्या लोकांना आहे. इथे येणार काम करणार आणि तंगड्या वर करणार. तुझ्या इथे येऊन तुला मराठी माणूस आपटू शकतो. दुबे कुत्र्यासारखा असेल, गुरफटून बोलत असेल. बाहेरच्या लोकांनी मराठी भाषेची अस्मिता आणि ही भाषा जपलीच पाहिजे. दुबे यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे, महाराष्ट्रात आले तर चपलेचा प्रसाद नक्की देईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
नेमकं काय म्हणाले निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे म्हणाले की, तुम्ही कोणाची भाकरी खाताय. टाटा, बिर्ला, रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात. महाराष्ट्रात काही युनिट नाहीत. टाटा नसते जर बिहार नसतं. टाटांनी पहिली फॅक्ट्री इथेच बांधली. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय. तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे? खाण आमच्याकडे आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडीसाकडे आहे. रिफायनरी रिलायन्सने बसवलीय ती गुजरातमध्ये आहे. सेमी कंडक्टर्सची इंडस्ट्री गुजरातमध्ये आहे. तुमच्याकडे काही नसताना वरून तुम्ही आमचे शोषण करून कर भरताय. जर तुमच्यात हिंमत आहे आणि हिंदी भाषिक लोकांना मारताय तर उर्दू, तमिळ, तेलगु भाषिकांनाही मारा. तुम्ही घाणेरडं कृत्य करताय. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. तुमच्या घरात सिंह असतो, असं तुम्ही म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.