जिंकता जिंकता सबालेंका हरली, आघाडीवर असताना सलग दहा गेम गमावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विजय अगदी हाताच्या अंतरावर उभा होता. पहिला सेट खिशात होता, दुसऱया सेटमध्ये 4-1 ची भक्कम आघाडी होती आणि उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित वाटत होते. मात्र त्यानंतर जे घडले त्याने रोलाँ गॅरोच्या प्रेक्षकांनाच नव्हे तर संपूर्ण टेनिसविश्वाला धक्का बसला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या एरिना सबालेंकाला डायना श्नायडरने 3-6, 7-5, 6-0 असे पराभूत करत फ्रेंच ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयासह श्नायडर प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिसच्या उपांत्य फेरीत पोहोचली. तिची गाठ आता पोलंडच्या ख्वालिन्स्काशी पडेल. तर दुसरा उपांत्य सामना मार्ता कोत्स्युक आणि मिरा आंद्रेइवा यांच्यात होईल.

सामन्याच्या सुरुवातीपासून सबालेंका आक्रमक होती. तिच्या दमदार फटक्यांसमोर श्नायडर बचावात्मक भूमिका घेत असल्याचे चित्र होते. पहिला सेट 6-3 असा जिंकल्यानंतर दुसऱया सेटमध्येही सबालेंकाने 4-1 अशी आघाडी घेतली. तेव्हा सामना एकतर्फी होणार अशीच चिन्हे होती. मात्र त्यानंतर अचानक तिच्या खेळाचा सूर बदलला.

वादळी वाऱयांमुळे कोर्टवरील परिस्थिती अवघड बनली होती. सबालेंकाच्या फटक्यांमध्ये अचूकता राहिली नाही. तिच्याकडून तब्बल 57 अनफोर्स एरर्स झाले. गुण गमावताच तिचा संयम सुटू लागला. ती कोर्टवर चेंडूला लाथ मारताना दिसली, स्वतःवर ओरडू लागली आणि आयोजकांच्या दिशेने संताप व्यक्त करू लागली. तिच्या चेहऱयावरची निराशा आणि असहाय्यता प्रत्येक गुणागणिक वाढत गेली. याच संधीचा श्नायडरने अचूक फायदा घेतला. तिने आपला खेळ अधिक शिस्तबद्ध केला आणि सबालेंकाकडून दुसरा सेट 7-5 असा हिसकावून घेतला. त्यानंतर तिसऱया सेटमध्ये तर सबालेंका पूर्णपणे कोलमडली. श्नायडरने सलग दहा गेम्स जिंकत तिसरा सेट 6-0 असा खिशात घातला आणि आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय साजरा केला. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये एकही सेट न गमावणाऱया सबालेंकाची ही अशी घसरण अनेकांना अनपेक्षित वाटली.

आत्ताच टेनिस सोडून द्यावंसं वाटतेय

पराभवानंतर सबालेंकाने निराशेच्या भरात, आत्ता या क्षणी मला टेनिसच सोडून द्यावंसं वाटत आहे. काही दिवसांनी माझी मनःस्थिती कशी असेल ते पाहू, अशी प्रतिक्रिया दिली. तिच्या या वक्तव्यामुळे टेनिसविश्वातही खळबळ उडाली आहे.

‘पुरुषांसाठी वेगळे नियम का?’ सबालेंकाचा हल्लाबोल

डायना श्नायडरकडून झालेल्या धक्कादायक पराभवाचा राग एरिना सबालेंकाने केवळ स्वतःवरच काढला नाही, तर थेट फ्रेंच ओपनच्या आयोजकांनाही लक्ष्य केले. कोर्ट फिलीप-शात्रियेवरील छप्पर उघडे ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिने पुरुष आणि महिला सामन्यांबाबत दुहेरी निकष लावले जात असल्याचा गंभीर आरोप केला.

Comments are closed.