विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला तर त्याच्या जागी कोण? 'हे' खेळाडू शर्यतीत
आयपीएल 2026 च्या थरारानंतर खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर रुजू झाले आहेत. भारतीय संघही येत्या 6 जूनपासून घरच्या मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी आणि वनडे सामने खेळणार आहेत. यामधील तीन सामन्यांची वनडे मालिका 13 जूनपासून खेळली जाणार असून यजमानांना मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू विराट कोहली या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतलेला विराट भारताकडून केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळतो, मात्र आता त्याला पुन्हा एकदा भारताच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे दिसते. तो बाहेर झाला तर त्याच्याजागी कोण येणार हा प्रश्न निर्माण होतो. त्याची जागी घेण्यास तीन पर्याय उपलब्ध आहेत, त्याबद्दल जाणून घेऊ.
विराट आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात शेवटपर्यंत खेळला होता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे समोर येत आहे, यामुळे तो आगामी वनडे मालिकेला मुकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच रोहित शर्माच्याही उपलब्धतेबाबत अनिश्चितता आहे, कारण तो अजूनही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे.
फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी झाल्यानंतरच रोहितचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याच्याबाबतीत मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अशा गंभीर स्थितीत भारतीय निवड समितीला वनडे संघात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यातील यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल आणि तिलक वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे.
जायस्वाल शेवटच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता, मात्र सर्व सामन्यांसाठी त्याला बाकावर बसावे लागले होते. संघासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (6 डिसेंबर, 2025) खेळलेल्या आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. रोहितचा सहभाग अनिश्चित असल्याने सलामीसाठी जायस्वाल उत्तम पर्याय आहे. तसेच पडिक्कल विराटच्या जागी स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीच्या नऊ सामन्यांमध्ये 725 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2021 मध्ये खेळला होता. नुकतेच पार पडलेल्या आयपीएल 2026 मध्येही त्याने उत्तम कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजेतेपदाच मुख्य कामगिरी बजावली आहे.
तसेच ऋतुराजला भारत अ संघात घेतले असून त्याला पुन्हा एकदा वरिष्ठ संघात स्थान मिळणार की नाही, याकडे लक्ष असेल. त्याचबरोबर साई सुदर्शन आणि तिलक यांनाही अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जूनला धरमशालामध्ये, दुसरा सामना 17 जूनला लखनऊ आणि तिसरा सामना 20 जूनला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.
Comments are closed.