Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या…; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन

सचिन तेंडुलकरने IPL नियम बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी आयपीएलमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समतोल राखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. विशेषतः 2023 पासून लागू करण्यात आलेल्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर त्यांनी नाराजी व्यक्त करत तो रद्द करण्याची मागणी केली आहे.

सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले नवीन नियम (Sachin Tendulkar proposes IPL rule changes)

इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार, एखादी टीम सामन्यादरम्यान अंतिम अकरातील एका खेळाडूच्या जागी आधीच जाहीर केलेल्या पाच पर्यायी खेळाडूंमधून एकाला संधी देऊ शकते. मात्र, तेंडुलकर यांच्या मते या नियमामुळे टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना जास्त फायदा होत असून गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव निर्माण होत आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फो पुरस्कार सोहळ्यात बोलताना तेंडुलकर म्हणाले की, “टी-20 क्रिकेटमध्ये फक्त 20 षटके खेळायची असतात. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक फलंदाज जोडण्याची संधी दिली जाते. आधीच गोलंदाजांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे खेळातील समतोल बिघडल्याचे मला वाटते.”

गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढल्याचे दिसून आले आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गजांनीही या नियमावर टीका केली आहे. त्यांच्या मते, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असून संघरचनेतील कौशल्यपूर्ण नियोजनावरही परिणाम होत आहे.

तेंडुलकर यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या डावाच्या पहिल्या सहा षटकांमध्ये फलंदाजांसाठी पॉवरप्ले असतो. मात्र त्यांनी पहिले चार षटके फलंदाजांसाठी राखून ठेवावीत आणि उर्वरित दोन पॉवरप्ले षटके क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्याच्या सोयीनुसार वापरण्याची मुभा द्यावी, असे सुचवले. यामुळे गोलंदाजांनाही काही प्रमाणात फायदा मिळू शकतो.

याशिवाय, प्रत्येक गोलंदाजाच्या चार षटकांच्या मर्यादेत वाढ करून ती पाच षटकांपर्यंत नेण्याचीही त्यांनी शिफारस केली. “संघातील सर्वोत्तम फलंदाज अनेकदा संपूर्ण 20 षटके खेळतो. मग सर्वोत्तम गोलंदाजाला पाच षटके टाकण्याची संधी का मिळू नये?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तेंडुलकर यांच्या या सूचनांमुळे भविष्यात टी-20 क्रिकेट अधिक संतुलित आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा –

RCB vs GT IPL 2026 Final Rain Update : गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट;  IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर…

आणखी वाचा

Comments are closed.