Singapore Open 2026: सात्विक-चिराग चॅम्पियन! इंडोनेशियन जोडीचा पराभव करत दोन वर्षांनंतर पटकावले पहिले विजेतेपद

भारतीय स्टार बॅडमिंटन पुरुष जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज (रविवार, 31 मे) सिंगापूर ओपन 750 पुरुष दुहेरीत विजेतेपदाची कामगिरी केली आहे. त्यांनी अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद शोहिबुल फिक्री यांना 18-21, 21-17, 21-16 असे पराभूत करत दोन वर्षांनंतर आपले पहिले विजेतेपद पटकावले आहे.

आज भिडण्याआधी भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा तीनदा सामना केला होता आणि त्यामध्ये इंडोनेशियन जोडी 2-1 अशी आघाडीवर होती. आता भारतीय जोडीने ते समीकरण 2-2 असे बरोबरीत आणले आहे. 2024 मध्ये थायलंड ओपन जिंकल्यानंतर सात्विक-चिराग पहिल्या विजेतेपदाच्या शोधात होते आणि सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्याची सुरूवात तणावपूर्ण झाली. 3-5 असे मागे पडल्यानंतर भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन करत महत्त्वाच्या रॅली जिंकल्या आणि 11-9 अशी आघाडी घेतली. यादरम्यान चिराग त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता. त्याला फ्रंट कोर्टमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीचा प्रयत्न अपुरा पडला आणि इंडोनेशियन जोडीने विजयी सुरूवात केली.

दुसऱ्या गेममध्ये आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय जोडीने जोरदार सुरुवात केली आणि सेट 5-5 असा राहिला. हा सेट चुरशीचा झाला. मध्यंतरात मात्र सात्विक-चिरागने 11-8 अशी आघाडी घेतली. त्यांनी आपली पकड आणखी मजबूत करत आघाडी 14-8 अशी केली. मध्ये काहीवेळ इंडोनेशियन जोडीने आघाडी घेतली होती, मात्र भारतीय जोडीने चांगला खेळ करत दुसरा गेम जिंकला आणि सामना बरोबरीत आणला.

निर्णायक गेमची सुरूवात मोठ्या आत्मविश्वासाने झाली. दोन्ही बाजूंनी अटीतटीचा खेळ झाल्याने दोन्ही जोड्यांचे सामन्यावर नियंत्रण राखण्याचे प्रयत्न दिसले. यामध्ये भारतीय जोडी वरचढ ठरली आणि निर्णायक गेम जिंकत विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला. हा सामना एक तास 13 मिनिटे चालला. 2022 आणि 2024 मध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर भारतीय जोडीचे हे सुपर 750 स्पर्धेचे तिसरे विजेतेपद ठरले आहे.

Comments are closed.