सचिन तेंडुलकरची सनटेक एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक, क्रिकेटच्या देवाची आता सौर ऊर्जेला साथ!
मुंबई : मैदानावर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडल्यानंतर, आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देशात ‘स्वच्छ ऊर्जे’चा प्रकाश पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ‘ट्रुझोन सोलर’ (ट्रुझोन सोलर) या ब्रँडअंतर्गत कार्यरत असलेल्या सनटेक एनर्जी सिस्टम्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केली आहे.
2030 पर्यंत अव्वल स्थानी पोहोचण्याचे लक्ष्य
सचिन तेंडुलकर यांच्या रूपाने कंपनीला केवळ एक गुंतवणूकदारच नाही, तर विश्वासार्हतेचा एक मोठा चेहरा मिळाला आहे. या भागीदारीमुळे सनटेक एनर्जीने २०२५ पर्यंत देशातील पहिल्या तीन ‘सोलर ईपीसी’ कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तेंडुलकर यांच्या सहभागामुळे ब्रँडच्या विश्वासार्हतेला नवी उंची प्राप्त झाली असून, राष्ट्रीय पातळीवर कंपनीचा विस्तार अधिक वेगाने होणार आहे.
‘या’ राज्यांवर असणार विशेष लक्ष
सचिन तेंडुलकर यांच्या गुंतवणुकीमुळे कंपनीला आपली पायाभूत सुविधा आणि वितरण प्रणाली मजबूत करण्यास मदत होणार आहे. कंपनी सध्या महाराष्ट्रतेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यात कारभाराचा विस्तार करतेय. तर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि केरळ यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये वेगाने प्रवेश करण्याचा कंपनीचा मानस आहे..
“सचिन तेंडुलकर यांनी दाखवलेला विश्वास ही केवळ गुंतवणूक नसून आमच्या मूल्यांना मिळालेले मोठे पाठबळ आहे. घराघरांत आणि उद्योगांपर्यंत स्वच्छ ऊर्जा पोहोचवण्याचे आमचे ध्येय आता अधिक सुस्पष्ट झाले आहे.” असे यानिमित्ताने कंपनीचे संस्थापक श्री. चारुगुंडला भवानी सुरेश यांनी म्हटलंय.
सर्वसामान्यांपासून उद्योगांपर्यंत सर्वांसाठी ‘सौर ऊर्जा’
ट्रुझोन सोलर ही कंपनी केवळ मोठ्या उद्योगांसाठीच नाही, तर निवासी संकुले आणि शेतीसाठीही (पीएम-कुसुम योजना) सौर ऊर्जा प्रकल्प राबवते. डिझाइनपासून ते देखभालीपर्यंत सर्व सेवा कंपनीमार्फत दिल्या जातात. तेंडुलकर यांच्या या नवीन इनिंगमुळे आता ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो ग्राहक सौर ऊर्जेकडे वळतील आणि भारत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.