‘सह्याद्री’ वाचवण्यासाठी सोमवारपासून ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा

पश्चिम घाट (सह्याद्री) क्षेत्रातील पर्यावरण आणि समृद्ध जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी ‘सह्याद्रीच्या रक्षणासाठी-पारगड ते रायगड जागरण यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी यात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोहिमेचे निमंत्रक कॉ. संपत देसाई व राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.

दक्षिण भारताचा प्रमुख जलस्रोत आणि दुर्मिळ पशुपक्षी व वनस्पतींचा अधिवास असलेल्या सह्याद्रीत प्रस्तावित प्रकल्पांमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. भीमाशंकर व तारळी पाठोपाठ आता कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यात 5 पंप स्टोरेज प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांसह शक्तीपीठ महामार्गासारख्या उपक्रमांमुळे सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर समृद्ध जंगल नष्ट होऊन इथली जैवविविधता आणि मानवी जीवन धोक्यात येण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. याविरोधात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा काढली जात असून तिचा पहिला टप्पा पारगड ते पन्हाळगड असा असणार आहे. या यात्रेत आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ लेखक राजन गवस, पृष्णात खोत, कॉ. उदय नारकर, कॉ. सुभाष लांडे, श्रीपाद धर्माधिकारी यांच्यासह राज्यभरातील सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, लेखक, कवी व पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.

पहिला दिवस (३० नोव्हेंबर) ः सकाळी 10 वाजता चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड येथून यात्रेची सुरुवात होईल. त्यानंतर हेरे मार्गे चंदगड येथे सभा, धामापूर-पुरणी येथे सभा व जेवण होऊन आजरा येथे यात्रेचा मुक्काम व जाहीर सभा होईल.

दुसरा दिवस (१ डिसेंबर) ः यात्रा पेरणोली, देवकांडगाव, पाटगाव, कडगाव मार्गे शेळोली व मडुरहून गारगोटी येथे पोहोचेल. या संपूर्ण मार्गात विविध ठिकाणी जनजागृतीपर सभा आयोजित केल्या आहेत.

तिसरा दिवस (२ डिसेंबर) ः मुदाळ तिठा, सरवडे, शिरगाव, राशिवडे व सडोली मार्गे यात्रा पन्हाळगड येथे पोहोचेल आणि सायंकाळी 5 वाजता पन्हाळा येथे पहिल्या टप्प्याची सांगता सभा होईल.

Comments are closed.