ठरलं तर! टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक, बीसीसीआयसोबत डील फायनल, गौतम गंभीरसोबतही चर्चा

साईराज बहुतुले टीम इंडियाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक : भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवा स्पिन बॉलिंग कोच मिळण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर काम पाहत आहेत. त्यांच्या सोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केल, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सितांशु कोटक, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रयान टेन डोशेट आणि फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून टी दिलीप कार्यरत आहेत. मात्र आता संघात आणखी एका नव्या प्रशिक्षकाची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

टीम इंडियाला मिळणार नवा स्पिन बॉलिंग कोच

भारतीय संघात सध्या स्पिन बॉलिंग कोचची जागा रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. रिपोर्टनुसार, बहुतुले यांनी गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून, सर्व काही सुरळीत झाल्यास त्यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती होऊ शकते. सध्या साईराज बहुतुले आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स संघासोबत स्पिन बॉलिंग कोच म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर त्यांची भारतीय संघाच्या अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी संधी मिळाली नव्हती. आता पुन्हा एकदा ते टीम इंडियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

कोण आहेत साईराज बहुतुले? (Who is Sairaj Bahutule?)

साईराज बहुतुले यांचा जन्म 6 जानेवारी 1973 रोजी मुंबईत झाला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांचा भीषण कार अपघात झाला होता. या अपघातानंतर ते काही काळ कोमामध्ये होते. इतकंच नाही तर डॉक्टरांनी ते पुन्हा चालू शकतील का याबाबतही शंका व्यक्त केली होती. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बहुतुले यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी 188 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 630 विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीत त्यांच्या नावावर तब्बल 405 विकेट्स आहेत. फलंदाजीतही त्यांनी 9 शतके आणि 26 अर्धशतके झळकावत 6176 धावा केल्या. तसेच 143 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्यांनी 197 विकेट्स घेतल्या.

भारतासाठी कसं राहिलं करिअर?

साईराज बहुतुले यांनी 1997 मध्ये भारताकडून श्रीलंकाविरुद्ध वनडे पदार्पण केले. त्यानंतर 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. 1997-98 च्या इराणी कप स्पर्धेत 13 विकेट्स घेत त्यांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. बहुतुले यांनी भारतासाठी 2 कसोटी आणि 8 वनडे सामने खेळले. कसोटीत त्यांच्या नावावर 3 विकेट्स, तर वनडेत 2 विकेट्स नोंदल्या गेल्या. जरी आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी झाली नाही, तरी देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांचे योगदान आजही मोठे मानले जाते.

हे ही वाचा –

Team India : श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?

आणखी वाचा

Comments are closed.