‘जीवा महाला’च्या भूमिकेत दिसला सलमान खान, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तुफान चर्चा
अभिनेता रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट आज 1 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अभिनेता सलमान खानच्या भूमिकेने (Cameo) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सलमान खान आणि रितेश देशमुख पुन्हा एकदा एकत्र दिसले असून, सलमानच्या एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटगृहांमध्ये सलमानची एन्ट्री होताच चाहत्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान खान भगवा कुर्ता, डोक्यावर फेटा, कपाळावर टिळा आणि पिळदार मिशा अशा ऐतिहासिक लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू आणि शूर सहकारी ‘जीवा महाला’ यांची भूमिका साकारत आहे. एका सीनमध्ये तो शत्रूच्या गळ्याला तलवार लावून “शिवाजी नाही; शिवाजी राजे म्हणायचं!” असे म्हणताना दिसतोय. त्याचा हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला आहे.
राजा शिवाजी ❤️ मध्ये सुपरस्टार सलमान खानचा दमदार कॅमिओ pic.twitter.com/eRylWeHKva
— (@Tera_Baap_x9) 1 मे 2026
सलमान खान या चित्रपटाचा भाग कसा बनला, याबाबत रितेश देशमुखने एका मुलाखतीत सांगितले होते. रितेशने जेव्हा या चित्रपटाचे काम सुरू केले, तेव्हा सलमानने स्वतःहून विचारले की, “तू माझ्याशिवाय हा चित्रपट कसा काय बनवू शकतोस? या चित्रपटात माझी भूमिका कोणती आहे?” त्यानंतर सलमानसाठी ‘जीवा महाला’ यांची ऐतिहासिक आणि महत्त्वाची भूमिका निवडण्यात आली. सलमानच्या या ‘आयकॉनिक’ लूकचे आणि अभिनयाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखसोबत अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी आणि जेनेलिया देशमुख असे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण वाई, महाबळेश्वर, सातारा, मुंबई यांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले आहे.
Comments are closed.