घरपट्टीवाढीविरोधात ‘बोंबाबोंब आंदोलन’, कृती समितीचा ‘सांगली बंद’चा इशारा

महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित लागू केलेल्या अन्यायी घरपट्टीवाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी तातडीने वाढीव घरपट्टी रद्द न केल्यास सांगली बंद आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

सांगली महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्य आधारित पद्धतीने लागू करण्यात आलेल्या मालमत्ता करावरून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. घरपट्टीच्या बिलामध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समिती स्थापन झाली; पण समितीत केवळ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचाच भरणा आहे. प्रत्यक्षात कर आकारणीतील तांत्रिक त्रुटी दूर करू शकणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. यात बिल्डर्स, वास्तुविशारद, नगररचनाकार, कायदेतज्ज्ञ आणि अनुभवी माजी नगरसेवक तसेच जाणते नागरिक यांचा समावेश असावा.

त्यामुळे महापालिकेने नेमलेली समिती केवळ औपचारिकता आहे. घरपट्टीची आकारणी कायमस्वरूपी धोरण म्हणून असेल, तर ती अधिक तंत्रशुद्ध व पारदर्शक हवी. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल; मात्र प्रशासनाने सध्याची पूर्ण प्रक्रिया थांबवून या परिपूर्ण समितीच्या अहवालाची वाट पाहावी आणि तोपर्यंत बिले देऊ नयेत, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास सांगली बंद आंदोलन करू, असा इशारा सतीश साखळकर यांनी दिला.

या आंदोलनात माजी नगरसेवक हणमंत पवार, वि. द. बर्वे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, रवींद्र वळवडे, ज्योती आदाटे, डॉ. संजय पाटील, अजित सूर्यवंशी, बाळासाहेब मासुले, उमेश देसाई, सुरेश टेंगले, नितीन मिरजकर, जयपाल चौगुले, हरिदास पाटील, योगेंद्र थोरात, नितीन चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, शशिकांत गायकवाड, उत्तम कांबळे, शंकर पुजारी आदी सहभागी झाले होते.

Comments are closed.