ज्या निर्दयीपणे ती झाडं कापली ते कृत्य मानवी राक्षस करू शकतो, महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं हे सरकार मानवी राक्षसच – संजय राऊत

कर्जत भीमाशंकरच्या जंगलात टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली केल्या आहेत. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ”ज्या निर्दयीपणे ती झाडं कापली ते कृत्य मानवी राक्षस करू शकतो, महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं हे सरकार मानवी राक्षसच आहे. ज्या ठिकाणी या झाडांचे कत्तली केल्या आहेत तिथे हजारो ओंडके पडले आहेत. या झाडाच्या ओंडक्यांच्या चिता पेटवू व पर्यावरण विरोधी सरकारला जाळू”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

”ज्या निर्दयीपणे ती झाडं कापली ते कृत्य मानवी राक्षसच करू शकतो. महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार मानवी राक्षस आहे. तुम्ही जर चित्र पाहिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असतं. निर्दयीपणे झाडांच्या कत्तली केल्या. आम्ही जी झाडं मोजली तो आकडा 2503 होता. पहिल्या टप्प्यात 33 हजार झाडं तोडणार आहेत. एवढी झाडं तोडणार म्हणजे संपूर्ण जंगल नष्ट करणार. भीमाशंकर अभयारण्य तिथून वीस किलोमीटरवर आहे. या साय जंगलात आदिवासी राहतात. जल, जमीन, जंगल ही आदिवासींची प्रॉपर्टी आहे. नरेंद्र मोदी म्हणतात एक पेड माँ के नाम म्हणतात. ही सर्व त्या कातकरांनी लावलेली झाडं आहेत. त्यांना आई नाही का? तिथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितलं की त्या डोंगरात अनेक वन औषधी आहेत. साप चावतो, दमा होतो त्यासाठी औषधं आहेत. त्या औषधींनी माणसाचे जीव वाचवले जातात. फडणवीसांनी हे गुजरातच्या टोरंट कंपनीला परवानगी दिली व अख्खं जंग त्यांच्या ताब्यात दिलं. महाराष्ट्रातली जंगलं नष्ट करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करायच्या, ती जंगलं मेहता शहांना द्यायची. शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांच्यावर बंदूका रोखायच्या. रायगड जिल्ह्यात ग्रामस्थांना मारण्यासाठी हजारोंच्या संख्येने पोलीस तिथे उभे आहेत. काल आदित्य ठाकरेंसोबत ग्रामस्थांचं बोलणं झालं आहे. देशभरातील निसर्ग प्रेमींनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सगळे तिथे येणार आहेत”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारच्या वनीकरणाच्या दाव्यावर बोलतानाही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांची सालटी काढली. ”200-300 वर्षांपूर्वीची झाडं तोडायची आणि कुठेतरी रोपटी लावायची, त्याने काय होणार? आरेच्या जंगलात रात्रीच्या काळोखात झाडं तोडली. त्या झाडांवरची घरटी पडली. रात्रभर ते पक्षी आक्रोश करत होते. त्यांची अंडी फुटली. त्यांची पिल्लं पडली खाली. काल ही झाडं तोडली तेव्हा हजारो पक्षी आक्रोश करत होते. लाज वाटत नाही का या सरकारला? मोदी फडणवीस यांच्या सरकारला लाज वाटत नाही. मोदी फडणवीसांनी त्यांच्या कॅबिनेटमधलं पर्यावरण खातं रद्द करावं, ते फक्त डिल करतात. पैसे खातात, उद्योगपतीकडून झाडं तोडण्यामागे पैसे घेतात”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

”महाराष्ट्रात उद्योग यायला हवे अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्र कायम उद्योग फ्रेंडली राज्य राहिलं आहे. या मुंबईत सव्वा तीनशे गिरण्या होत्या, उद्याोग पट्टा होता. मुंबईतले औद्योगिक प्रकल्प आम्ही आणले आहेत. तुम्हाला कुणाचातरी गुजरातमधल्या व्यक्तीचा काळा पैसा इथे गुंतवायचा आहे. बाकी काही नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

”हजारो लोकं या प्रकल्पाला विरोध करतायत, भूकंप व्हायची शक्यता आहे तिथे आणि अशा सगळ्यांची वकीली महान वकील उज्ज्वल निकम करत आहेत. ते कष्टकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या जनत्चाय बाजूने उभे राहिलेले नाहीत. ते उभे राहिले आहेत टोरंट कंपनीच्या बाजूने. हा प्रकल्प किती महान आहे हे सांगण्यासाठी उज्ज्वल निकम उभे राहिले हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपमध्ये गेल्यावर एका खासदारकीसाठी आपल्या इज्जतीची लक्तरं काढावी लागतात. उज्जव निकम आमचे मित्र आहेत पण आता ते राक्षसांच्या पक्षात गेले आहेत. ते जे काही मानवतेबाबत सांगत होते. दहा झाडं तोडणं म्हणजे एक कसाब, निर्सगाचे हत्यारे आणि कसाब यांना एकाच तागडीत आम्ही तोलतो. तुम्ही अडीच हजार झाडं तोडली आहेत. ही झाडं तोडणारे कसाबचे बाप आहेत. मला त्यांना नम्रपणे सांगायचे आहे की आम्हाला जास्त तोंड उघडायला लावू नका. स्वत:ची बेअब्रू करून घेताय आणि भाजप त्यांची बाजू मांडायला अशा लोकांचा वापर करतोय”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”चंद्रपूरमध्ये अदाणीला खाणी देतायत तिथे. पाच हजार झाडं तोडतायत. विदर्भात व्याघ्र कॉरिडोअरमध्ये पाच हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे. अदानीने या देशाच्या इभ्रतीची जगभरात कत्तल केली आहे. विदर्भ हा व्याघ्र प्रकल्पासाठी जगभरात ओळखला जातोय. स्वत:ला विदर्भाचे सुपुत्र समजणाऱ्या फडणवीसांनी तरी त्यांना विरोध करायला हवा. एका अदाणीच्या फायद्यासाठी पाच हजार झाडं तोडणार असतील तर असे अदाणी आम्हाला नको आहेत. आम्हाला टाटा, बिर्ला, किर्लोस्कर महिंद्रा हवे आहेत. या मुंबईचं वैभव उद्योगपतींनी वाढवलंय. हिंदुहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे यांनी कायम उद्योगपतींना पाठिंबा दिला आहे. उद्योगपती जगला पाहिजे तर कामगार जगेल असे ते म्हणायचे”, असेही राऊत म्हणाले.

”आरे मधलं आंदोलन संपलेलं नाही. कर्जतच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या आंदोलनाची देखील ठिणगी टाकली जाईल. महाराष्ट्रात जिथे जिथे जंगलं तोडली जातील तिथे आम्ही पोहचू. आम्हाला ऑक्सिजन नाही, पाणी नाही. ढग नाही. हवा पाणी जल जमीन जंगल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हे जर मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या वकिलांना कळत नसेल तर त्यांचा जन्म व्यर्थ आहे. पाऊस गेला व तुम्ही झाडं तोडताय. 33 हजार झाडं तोडतायत. त्यातले 2 हजार झाडांचे मुडदे बघितले. या झाडांच्या ओंडक्यांचे करायचे काय? या झाडाच्या ओंडक्यांच्या चिता पेटवू व पर्यावरण विरोधी सरकारला जाळू. कोण आले आहेत या महाराष्ट्रात व कुणासाठी फडणवीस वकीली करतायत. या सरकारला बापाला सुद्धा आता जंगल तोडता येणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी या जंगलतोडीवर लिहलेल्या लेखावर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ”कोणतं अराजक? जंगल तोड थांबवा झाडं वाचवा, नद्या वाचवा हे अराजक आहे का मिस्टर फडणवीस? आपल्या मर्जीतल्या उद्योजकांसाठी मायनिंगच्या प्रकल्पांना मंजूरी देऊ नका, कातकरांच्या जमिनी लुटू नका हे सांगणं अराजक आहे का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या आदिवासी, शेतकरी, कातकरांना जगूच द्यायचा नाही का? या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या किती जमीन हातात घेणार आहात. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून रायगडमधील जमीनी गुजरातच्या उद्योगपतींसाठी लुटल्या आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. समर्थ रामदासांनी म्हटले आहे की, मारता मारता मरावे. त्यामुळे हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे. आम्ही शास्त्रानुसार बोलतो”, असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.