500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी एक बुळचट SIT स्थापन केली आहे, ती मुख्यमंत्र्यांना हवा तो रिपोर्ट देतील – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

”500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी सरकारने एक बुळचट SIT स्थापन केली आहे, ती मुख्यमंत्र्यांना हवा तो रिपोर्ट देईल. पण मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यातून ते या सर्वांना गाडणार आहेत. त्यानंतरच झेंडा फडकवतील”, असे संजय राऊत म्हणाले.

या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी तिची फॉरेन्सिक तपासणी आणि इतर तांत्रिक तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत विशेष तपास पथक नेमल्याचे जाहीर केले आहे.

या विशेष तपास पथकाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच दक्षिण परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि मुंबई गुन्हे शाखेचे सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे हे या पथकाचे सदस्य असणार आहेत.

Comments are closed.