भाजपचे नेते घातकी आहेत, फसवणूक करतात, असे अजित पवारांचे परखड मत होते; म्हणूनच माघारी वळले पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले होते – संजय राऊत

अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते, हे मी 100 टक्के सांगू शकतो, असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपचे नेते घातकी आहेत, फसवणूक करतात, असे अजित पवारांचे परखड मत होते; म्हणूनच माघारी वळले पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले होते असेही संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गेले तेव्हाच विलिनीकरणाची चर्चा संपली असे विधान केले होते. तसेच अजित पवार गटाच्या आमदार खासदारांची विलिनीकरणाबाबत मतं जाणून घेत आहेत. या प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, या दोन घटनांशी आमचा काहीही संबंध नाही. या दोन्ही घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबी आहेत. महाविकास आघाडीचा संबंध केवळ या एका मुद्द्याशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई पवार यांनी विलिनीकरणाच्या नाट्यावर किंवा खेळावर पडदा टाकला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा विषय संपला आहे, असेही संजय राऊत म्हणाले. अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते, हे मी 100 टक्के सांगू शकतो. महायुतीमध्ये त्यांना स्वाभिमानाने जगता येत नव्हते. भाजपचे नेते घातकी आहेत, फसवणूक करतात, असे त्यांचे परखड मत होते. त्यांच्यासोबत असलेले लोकही याची पुष्टी करतील. त्यामुळे आपण पुन्हा एकत्र आले पाहिजे आणि माघारी वळले पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले होते. अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते. मी यापूर्वीही हे सांगितले आहे. अजित पवारांचा भाजपसोबत जाण्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला होता, असे मी वारंवार सांगत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

एकत्र येण्याच्या विषयावर अजित पवार यांच्या 27 बैठका झाल्या होत्या. मी विलिनीकरणाबद्दल बोलत नाही, तर एकत्र येण्याच्या विषयावर या बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. त्यामध्ये जयंत पाटील, शरद पवार साहेब यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर हा विषय संपला. आता त्यात काहीही उरलेले नाही. देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा हे शिंदे गट आणि अजित पवार गट असे दोन्ही गट गिळंकृत करतील. किंबहुना, अमित शहा यांनी हे गट गिळले आहेत, याची जाणीव फडणवीसांनाही होणार नाही. वारंवार निर्णय घेण्यासाठी यांना दिल्लीला जावे लागते, यावरूनच त्यांच्या पक्षावर त्यांचे स्वतःचे नियंत्रण नसल्याचे दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.

सुप्रियाताई सुळे यांनी आज जे सांगितले आहे, ते सत्य आहे. ”विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून संपला असून आम्ही त्यावर पडदा टाकला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मग पडदा पडल्यानंतर दुसऱ्या बाजूने तो पुन्हा हलवण्याचा आणि तिसरी-चौथी घंटा वाजवण्याचा प्रयत्न कशासाठी सुरू आहे? नाटक संपले आहे आणि विलिनीकरणाचा खेळ सध्या स्थगित झाला आहे, असे मी मानतो असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

अजित पवार हे ईडी किंवा अन्य तपास यंत्रणांच्या भीतीपोटी नाईलाजाने भाजपसोबत गेले होते. त्यावेळी हसन मुश्रीफ यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्यासोबत होते. आज तेच हसन मुश्रीफ छाती पुढे काढून वाघासारखे चालतात; मात्र त्यांचे काळीज उंदराचे आहे. ईडीच्या कारवाईमुळे त्यांची कशी पळापळ झाली, हे सर्वांनी पाहिले आहे. एवढे होऊनही भाजपने अजित पवार यांच्या फाईल्स बंद केल्या नाहीत. जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय असो किंवा इतर प्रकरणे, त्यांच्या बहिणींवरही त्या काळात धाडी पडल्या होत्या. या सगळ्या घटनांमुळे अजित पवार अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत येथे थांबून काही उपयोग नाही आणि येथे आपल्याला स्वाभिमानाने राहता येणार नाही, असे त्यांनी ठरवले होते. भारतीय जनता पक्ष हा स्वाभिमानाने जगणाऱ्या लोकांचा पक्ष नाही, असे त्यांचे मत होते. अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदारांचे संख्याबळ बहुमताच्या निकषापर्यंत पोहोचत नसले, तरी त्यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या बळावर ते उत्तम विरोधी पक्षनेते होऊ शकले असते. मुळातच त्यांची मानसिकता सत्तेतून बाहेर पडण्याची होती. अजित पवार यांनी ”माझ्याकडे भाजपच्या नेत्यांच्या फाईल्स आहेत”, असे जे वक्तव्य केले होते, ती उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. त्यानंतर अजितदादांचा अपघातात मृत्यू झाला. या विषयावर कोणी का बोलत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘माझ्याकडेही भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या फाईल्स आहेत,’ असे जेव्हा अजित पवार ठासून म्हणाले, तेव्हा त्यांची मानसिकता भाजपमधून बाहेर पडण्याची होती, हे स्पष्ट होते. केवळ बाहेर पडण्याचीच नव्हे, तर बाहेर पडून भारतीय जनता पक्षाशी संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. त्यानंतर काही काळातच अजित पवार यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूबाबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी सातत्याने आवाज उठवायला हवा होता. ते गप्प कसे बसू शकतात? कोणाचा पती गेला, कोणाचा बाप गेला, याची आम्हाला चिंता वाटते. आमचा एक कार्यकर्ता प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली, म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत. पुर्णेकरांची हत्या झाली म्हणून आम्ही लढत आहोत. मात्र, एवढ्या मोठ्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला असताना महाराष्ट्रातील जनता आणि त्यांच्या कुटुंबातील लोक शांत कसे आहेत, याचे मला आश्चर्य वाटते, असे संजय राऊत म्हणाले.

माझ्या माहितीप्रमाणे, विलिनीकरणाचा प्रश्नच आता उरलेला नाही. सुप्रियाताई सुळे यांनी विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. मग याचा अर्थ सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवारांचा गट भाजपमध्ये विलीन होणार आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. जर शरद पवार साहेबांचा पक्ष विलिनीकरणाबाबत चर्चा करण्यास जाहीरपणे तयार नाही किंवा विलिनीकरण होणार नाही, असे सांगत असेल, तर देवेंद्र फडणवीस स्वतःशीच बोलत आहेत का? नाटकामध्ये एखादे पात्र स्वतःशीच संवाद साधते, त्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार नाही. हे आम्ही वारंवार सांगत आहोत. त्यांच्या विचारधारेबद्दल आणि भूमिकेबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. पवार साहेबांचा पक्ष म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. माननीय शरद पवार, माननीय सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासारखे पक्षाचे प्रमुख नेते भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाहीत. त्यामुळे याला विचारलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे, हा प्रश्नच कुठे येतो? शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा विचार भाजपचा आहे का? यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारसरणी महाराष्ट्रात रुजवण्यात शरद पवार साहेबांचे योगदान फार मोठे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक अभिसरणामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यात या नेत्यांसोबत शरद पवार साहेबांचाही फोटो लागेल, असे काम त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात केले आहे. त्यामुळे धर्मांध शक्ती किंवा देशद्रोही शक्तींसोबत शरद पवार साहेब कदापि जाणार नाहीत आणि त्यांचा पक्षही जाणार नाही. काही लोकांना मंत्री होण्याची इच्छा असते. मात्र, ही इच्छा दाबावी लागते. ती इच्छा बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊन संघर्ष करावा लागतो, असेही संजय राऊत म्हणाले.

जे जे भारतीय जनता पक्षासोबत गेले, मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार असोत किंवा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदार-खासदार असोत, त्या सर्वांना तिथे लाचारीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ घराची आठवण येणारच. आता ते हळूहळू संपर्क साधत आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्या आठवणी पुन्हा दाटून येत आहेत. आठवणींचे मोहोळ उठत आहे. त्यांना जुन्या दिवसांची आठवण येत असेल, तर येऊ द्या, असेही संजय राऊत यांनी नमदू केले.

Comments are closed.