शिंदे गटाकडूनच महाराष्ट्रात मराठीला विरोध, संजय राऊत यांचा घणाघात
महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्हा मराठी आलंच पाहिजे अशी ठाम भुमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली. तसेच शिंदे गटाकडूनच महाराष्ट्रात मराठीला विरोध होत आहे असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, मराठीला एकनाथ शिंदे गटाकडून विरोध होत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भुमिका ही महाराष्ट्राच्या हिताची आहे. त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. या भुमिकेला विरोध करणारे महाराष्ट्राच्या हिताचे विरोधी आहेत. देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ठामपणे याबाबत भुमिका मांडायला पाहिजे. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष म्हणून सातत्याने वर्षानुवर्ष मराठीसाठी लढत आहोत आणि संघर्ष करत आहोत. महाराष्ट्राला विरोध करून कसे काय इथे राहू शकतात? हा साधा प्रश्न आहे. तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे ही बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका आहे. त्यांची ही भुमिका प्रत्येक राज्यातल्या भाषेबाबतीत आहे. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्हा मराठी आलंच पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच महाराष्ट्रात मराठी सक्ती केली असेल तर त्यात चुकीचं काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आम्ही जेव्हा दिल्ली जातो तेव्हा हिंदीतच बोलतो. महाराष्ट्रात जर मराठी अनिवार्य करण्याबाबत कायदा झाला असेल तर त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. अनेक रिक्षावाले याविरोधात आंदोलन करत आहेत याचा अर्थ ज्या राज्यात तुम्ही पैसे कमवत आहात त्याचा तुम्ही सन्मान करत नाही आहात. ज्या राज्याने तुम्हाला रोजगार दिला, घर दिलं, सन्मान दिला आणि तुम्ही मराठी भाषेबाबत अशी भुमिका घेतली तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात राहून त्यांनी मराठी बोललंच पाहिजे कारण त्यांच्याशी व्यवहार करणारे जास्तीत जास्त लोक हे मराठी आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.