उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात नेतृत्व करावं अशी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भूमिका – संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात नेतृत्व करावं अशी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भूमिका असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या बाजूने 70 लाख मतं जास्त पडली आहेत असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मातोश्रीत आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोघांमध्ये फक्त विधानपरिषद विषयावर चर्चा नाही झाली, तर महाविकास आघाडी म्हणून भविष्यातल्या अनेक घडामोडींवर आपल्याला काय पावलं टाकावी लागतील, इतर निवडणुका असतील किंवा संघटनात्मक कामं असतील तर याबाबत चर्चा झाली. काँग्रेसची भुमिका आहे की, राज्यसभेला आपण शरद पवारांना पाठिंबा दिला तसेच आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंना आपण सर्वांना पाठिंबा द्यावा. ते यासाठी की, एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात असणं, हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी दिलासा देणारे कार्य असेल. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात महाविकास आघाडीचे नेतृत्त करावे अशी भुमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फोन करून सांगितले की आम्ही आमचे शिष्टमंडळ घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटायला येऊ. विधानपरिषदेच्या जागेसाठी आम्ही सगळ्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करणे गरजेचे का आहे, याबाबत आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. आता याबाबत निर्णय घेण्याची त्यांना मुभा आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पश्चिम बंगालमध्ये एक तुफान आलं आहे आणि त्यात हे विक्रमी मतदान झाले आहे. त्याचे एक कारण बंगालमध्ये जबरदस्तीने SIR प्रक्रिया राबवली गेली आहे. जर तुम्ही 70 लाख मतदार वगळले आहेत, तर ममता बॅनर्जी यांच्या बाजूने 70 लाख मतं जास्त पडली आहेत असा माझा अंदाज आहे. लोक जास्ती जास्त मतदान करत असतील तर ते लोकशाहीसाठी चांगली बाब आहे. पण यावेळी भाजप आणि केंद्र सरकारने बंगालमध्ये काय केलं हे सगळ्यांना पाहिलं. मतदार असो वा नसो देशात जिथे जिथे बंगाली लोक आहे तिथून सरकारी खर्चावर पश्चिम बंगालमध्ये आणलं गेलं. आणि सगळ्यांना मतदान करायला सांगितलं. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.