स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचा घणाघात
केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप आणि मिंधे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडण्याचे उद्योग महाराष्ट्रात करण्यात आले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत गद्दारांना झोडपून काढले. बाजारात उभे राहून स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई माध्यमांशी बोलताना केली.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फुटली असे मी म्हणत नाही. वैचारिक वारसा घेऊन किंवा एखाद्या विचारासाठी बाहेर पडतो त्याला फुटणे म्हणू शकतो. पण जर स्वत:ला बाजारात विकण्यासाठी उभे केले आणि तुम्हाला लिलावात कुणी विकत घेतले तर त्याला फुटणे म्हणत नाही. त्याला स्वत:ला विकणे असे म्हणतात. आमचे सहा लोक दोन दिवसांपूर्वी बाजारात उभे राहिले. राजकीय गोलपिठ्यात त्यांनी स्वत:ची बोली लावली आणि त्यांना विकत घेतले गेले. सत्तेवर बसलेल्यांकडे ठेकेदारी आणि महाराष्ट्राच्या लुटीचा अमर्याद पैसा असून त्या पैशांचा हा माज आहे. हा माजही उतरवला जाईल.
अजूनही हे लोक मुंबईत आलेले नसून त्यांच्यात कुणी मंत्री व्हायचे यावरून वाद सुरू आहेत. मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेल्या पाच जणांना वर्षभरात 25-25 कोटी रुपये देऊ, पण आता गोंधळ घालू नका अशी मांडवली झालेली आहे. त्यामुळे या लोकांकडून विचारांची किंवा बंडाची काय अपेक्षा? या लोकांच्या मतदारसंघातून प्रेतयात्रा काढल्या जात आहेत. हे बिळात लपून बसलेले आहेत. यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त लावले जात आहेत. गुन्हा केलेला नाही, पाप केलेले नाही, मग पुढे-मागे पोलीस ताफा कशाकरता? राज्याचे पोलीस फक्त गद्दारांच्या रक्षणासाठी आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.
राज्याची कायदा-सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावले असेल तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. स्वत:च्या हिमतीवर गद्दारी केली म्हणणाऱ्यांनी जनतेत फिरून दाखवावे. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आम्ही, कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. त्यामुळे थोडी जरी लाज असेल तर राजीनामा द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा, असे आव्हान राऊत यांनी दिले.
शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर बसल्याने सहा लोक सोडून गेले असे जामनेरच्या मावशीबाई म्हणाल्या. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे त्या सहा लोकांना माहिती होते ना. त्यांच्याच मदतीने हे सहा लोक निवडून आले. त्यामुळे या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का? याच काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेसचे लोक तुरुंगात गेले. क्रांतिकारक झाले. तुम्ही काय केले? देशासाठी प्राणाचा त्याग केला असा कुणी भाजपमध्ये आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.
Comments are closed.