कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून आलेलं सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करतंय, संजय र
बकरी ईद कुर्बानीनिमित्त संजय राऊत: बकरी ईदच्या (Bakri Eid 2026) पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपच्या (BJP) सात आमदारांसह अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायटी, रहिवासी संकुल आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. सोसायटीत कुर्बानीमुळे इतर धर्मीयांना त्रास होऊ शकतो, असा दावा पत्रात करण्यात आला होता. तर मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीतील कुर्बानीसाठी उभारलेल्या शेडवरून वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत सोसायटी परिसरात आंदोलन केले होते. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आता महाराष्ट्रात वडापाव सोबत मत्स्य पाव येणार आहे. हे नवीन-नवीन फंडे काढत असतात. पण खिमा पाव खायचा नाही. कारण त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे. काल या राज्यात मुस्लिमांच्या सणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवतात. अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका. महाराष्ट्र हा मांसाहारी आहे. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचे पालन करणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादत आहात? महाराष्ट्राची दिशा अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Bakri Eid Qurbani: कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापले गेले
संजय राऊत पुढे म्हणाले की, यावर गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बसून तोडगा काढायला हवा होता. महाराष्ट्राचे सरकार देवळात बळी देऊनच आले आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापले गेले. ती कुर्बानीच आहे. त्या कुर्बानीवर देखील तुम्ही आक्षेप घ्यायला हवा. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आले आहे ते सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत. हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात मांसाहार होणारच आहे. जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत ज्यांनी मंदिरात 55 रेडे कापले आणि सत्तेवर आले. त्यांच्यासोबत आपण बसलेला आहात. त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
Sanjay Raut on NEET Exam Paper Leak: शाह कुठे ना कुठे येतोच
नीट पेपरफुटी प्रकरणात तेजस शाह या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीचं केंद्र हे महाराष्ट्र आहे. तेजस शाह यामागे आहे. शाह कुठे ना कुठे येतोच. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जेवढी जबाबदारी आहे. तेवढी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आहे. जसे भाजपच्या ताब्यात निवडणूक आयोग आहे. इतर यंत्रणा आहेत आता तशाच स्पर्धा परीक्षाही त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं. त्यांच्या लोकांना फायदा व्हावा, त्यांच्या लोकांना पेपर मिळावा, यासाठी हे सगळं केलंय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.