Sarfaraz Khan ची टीम इंडिया कमबॅक स्टोरी, काश्मीरमध्ये कसून सराव अन् घटवलं 17 किलो वजन!

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेची सुरूवात येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी निवडलेल्या भारतीय संघात दोन मोठे बदल झाले, त्यापैकी एक सरफराज खानचे संघपुनरागमन. त्याला साई सुदर्शनच्या जागी संघात जागा मिळाली आहे. सुदर्शन दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. सरफराजचे पुनरागमन काही सोपे नव्हते. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि जवळपास 17 किलो वजन कमी केले. त्याने भारतीय संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी काय-काय केले ते जाणून घेऊ.
सरफराजने भारतीय संघात बोलावण्याआधी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘मी कदाचित संघात सामावून जाणार नाही, मात्र मी कोणतीही कसर सोडणार नाही.’ यामधून त्याचा विश्वास दिसून येतो. आता तो पुन्हा एकदा भारतीय संघाचा भाग बनला आहे.
सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराजची श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात बदली खेळाडू म्हणून निवड झाली. मुंबईच्या या खेळाडूने संघात जागा मिळवण्याची खूपच धडपड आणि मेहनत केली आहे. त्याने दीड वर्षांत जवळपास 17 किलो वजन कमी केले आहे. पावसामुळे मुंबईमध्ये नियमित सराव करणे अशक्य असल्याने तो थेट काश्मीरला रवाना झाला.
सरफराजने काश्मीरच्या ‘शेर ए काश्मीर’ या स्टेडियमवर अनेक तास सराव केला आणि आपल्या कौशल्यांमध्ये अधिक सुधारणा केली. तसेच त्याने रणजी ट्रॉफी आणि आयपीएलनंतर मुंबई टी20 लीगमध्ये आकाश टायगर्स वेस्टर्न मुंबई सबर्ब्स संघाकडून खेळताना काही लक्षवेधी खेळी केल्या. त्याने बीकेसी येथील एमसीए इनडोअर सुविधेत ऍस्ट्रो टर्फ विकेटवरही सराव केला.
त्याचबरोबर फिरकी गोलंदाजांविरुद्ध आपला खेळ उंचावण्यासाठी सरफराजने कुर्ला येथे खाजगी सुविधा भाड्याने घेतल्या. त्याच्याकडे रिव्हर्स स्वीप आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे त्याची पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये निवड होण्याची शक्यता आहे. कारण भारतासमोर प्रभात जयसूर्याचे आव्हान असणार आहे.
सरफराजला खेळण्याची संधी मिळाल्यास तो कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे. तसेच ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असल्याने दोन्ही संघांचा जिंकण्याचा जोरदार प्रयत्न असणार आहे.
Comments are closed.