बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी

बीड : जिल्ह्यातील शिरुर कासार येथील मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतिश उर्फ खोक्या (Beed) भोसलेचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून खोक्याचे प्रकरणं समोर आल्यानंतर वन विभाग आणि बीड पोलीसही खोक्याचा शोध घेत होते. अखेर, खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली असून लवकरच त्याला बीडमध्ये हजर केले जाणार आहे. मात्र, खोक्या बीडमध्ये येण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी (police) त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे, आता खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्‍चित झाली आहे. मागच्या आठवडाभरापासून विविध कारणाम्यांनी चर्चेत आलेल्या आणि भाजप आमदार सुरेश धस यांना टिकेचा धनी बनवणारा सतीश भोसले उर्फ खोक्याला हा मोठा धक्का बसला आहे.

एका व्यक्तीला बॅटने मारहाण, वाहनांत नोटांचे बंडलची ठेवाठेव, तसेच सोफ्यावर बसून नोटांचे बंडल जुळवण्यासह शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा करणारे सतीश भोसले उर्फ खोक्याचे व्हिडीओ समोर आले होते. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहेबाजूने टिका झाली. अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वन विभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा नोंद झाला. त्याच्या अटकेसाठी शिरुर बंद करुन मोर्चाही काढण्यात आला होता. सहा दिवसांपासून फरार असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांत जिल्ह्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच त्याला आणखी एक धक्का बसला आहे.

बीड जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई

खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे.

हेही वाचा

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही

अधिक पाहा..

Comments are closed.