काश्मीर-पुंछमध्ये सात आयईडी जप्त

लष्कराकडून कारवाई सुरूच : यापूर्वी बारामुल्लात स्फोटके हस्तगत

वृत्तसंस्था / श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे शोध मोहिमेदरम्यान लष्कराने 7 संशयित आयईडी आणि 7.62 मिमी लाईट मशीन गनचे (एलएमजी) एक मॅगझिन जप्त केले. सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 156 टेरिटोरियल आर्मी आणि 37 राष्ट्रीय रायफल्सने कासाबलारी गावाजवळ शोध मोहीम राबवत ही कारवाई केली. तपकिरी टेपने गुंडाळलेले सहा कंटेनर, निळ्या टेपने गुंडाळलेला एक कंटेनर आणि एक संशयित मॅगझिन कंटेनर जप्त करण्यात आल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले. या कारवाईत एक काळी बॅग, एक कॉम्बॅट पाऊच, एक पॉवर अडॅप्टर, एक पॉवर सोर्स, एक अॅल्युमिनियम कंटेनर आणि एक टिफिनही हस्तगत करण्यात आले.

काश्मीरमध्ये गेल्या 60 दिवसांत 18 दहशतवादी हस्तकांना अटक करण्यात आली आहे. पूंछमधील कारवाईपूर्वी सुरक्षा दलांनी बारामुल्लामध्ये 22 ऑक्टोबर रोजी दोन संशयित दहशतवादी साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून तुर्की बनावटीचे कानिक पिस्तूल, 10 काडतुसे असलेले एक मॅगझिन आणि दोन आयईडी जप्त करण्यात आले होते. दोन्ही संशयित बारामुल्ला येथे ओव्हरग्राउंड वर्कर्स म्हणून काम करत होते. त्यांनी दहशतवाद्यांना शस्त्रs आणि स्फोटके पुरवण्यास मदत केल्याचा संशय आहे. दोघेही सोपोरमधील चिंकीपोरा येथील रहिवासी आहेत. गुप्त माहितीच्या आधारे लष्कराच्या 52 राष्ट्रीय रायफल्स आणि बारामुल्ला पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्यांना दिलिना घाटाजवळील दरपोरा नर्सरी परिसरातून अटक केली होती. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही संशयितांची कसून चौकशी करताना पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.

Comments are closed.