लघु गृह उद्योग करणाऱ्या महिलांचा सन्मान
षण्मुखानंद चंद्रशेखरेन्द्र सरस्वती ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’च्या महिला कारागिरांच्या कार्याचा सन्मान सोहळा पार पडला. दरम्यान, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज गोयल यांनी कारागीर महिला भगिनींशी संवाद साधला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी लिज्जत पापडच्या प्रवासाची व भविष्यातील योजनांची माहिती महिलांना दिली.
1959 मध्ये सुरू झालेल्या लिज्जत पापडच्या प्रवासाला 1966 मध्ये केव्हीआयसीने ग्रामोद्योगाची मान्यता दिल्यानंतर गती मिळाली. आज या संस्थेच्या 83 शाखांच्या माध्यमातून 16 राज्यांतील 45 हजारांहून अधिक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. पापडाव्यतिरिक्त ही संस्था मसाले, पीठ, डिटर्जंट आणि लिक्विड सोप उत्पादित करत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, द. आफ्रिकेसह 30 हून अधिक देशांमध्ये उत्पादने निर्यात करत आहे. लिज्जत पापडला आतापर्यंत सर्वोत्पृष्ट ग्रामोद्योग पुरस्कार, ब्रँड इक्विटी अवॉर्ड आणि महिला विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे मनोज गोयल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला पुढे नेण्यात लिज्जत पापडसारख्या संस्थांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
Comments are closed.