100 टक्के कर्जमाफी आणि उर्वरित तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करा; शरद पवार यांची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पावसाने ओढ दिल्याने उभी पिकं करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी 100 टक्के कर्जमाफीसह उर्वरित तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

सध्या पाऊस पडला नसल्याने माणसं आणि गुरं-ढोरं कशी जगवायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या संदर्भात 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुरंदरसह अन्य वंचित तालुक्यात पूर्णपणे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता शेतात उभी असणारी पिकं कशी वाचवता येतील याचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे, पण काही तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नाही. तिथेही दुष्काळ जाहीर करण्यात आला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. हे संकट खूप मोठे असून काही तालुक्यांमध्ये अद्यापही दुष्काळ जाहीर झालेला नाही. पुरंदरसारखा तालुका दुष्काळाच्या यादीतून वंचित आहे. या तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला पाहिजे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून नगारिकांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करणार आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

Comments are closed.