काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, शरद पवारांच्या भेट
शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एनडीए आघाडीत सामील होणार अशी चर्चा असतानाच बुधवारी दिल्लीत अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी बुधवारी सकाळी अचानक संसदेत पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी हे अगदी हाताला धरुन शरद पवार (Sharad Pawar) यांना आपल्या कक्षात आणताना आणि हसतखेळत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु असलेले आंदोलन आणि दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना बेछूटपणे करण्यात आलेला लाठीमार यामुळे सध्या केंद्र सरकारविरोधात कधी नव्हे इतके नकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सरकार मोठ्या कोंडीत सापडले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांनी भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. शरद पवार हे जंतर मंतरवरील आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यातील दुवा ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics news)
मला शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल नेमकी काही माहिती नाही. पण पवार साहेबांचा जो काही अनुभव आहे, काल ते विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला जंतरमंतरवर गेले होते. अभिजीत दिपकेंना भेटले आणि पाठिंबा दिला. पवार साहेब आणि सुप्रिया सुळे पंतप्रधाानांसोबत याबाबत चर्चा करायला आणि मार्ग काढावा म्हणून गेले असतील, त्यासंदर्भात बैठक असेल. त्यापलीकडे काही राजकीय चर्चा झाली असेल, असे मला वाटत नाही. शरद पवार काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट द्यायला गेले, त्यांनी हे आंदोलन दडपू नये, असे वक्तव्यही केले होते. त्यामुळे आता याबाबत मार्ग निघावा म्हणून ते मोदींना भेटले असतील, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले.
Sharad Pawar: शरद पवारांकडून मोदींच्या भेटीसाठी कोणतं कारण सांगण्यात आलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजच्या भेटीवेळी पंतप्रधान मोदींना एक पत्र दिले. महाराष्ट्र कृषी आणि जलक्षेत्र संबंधित शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीबद्दलचे हे पत्र असल्याचे समजते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत, चौकशीतील विलंब टाळणे आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
सिंचन आणि पाणी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, सिंचन योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावे आणि रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करून थांबू नये, तर प्रत्येक शेतकऱ्याला MSP चा कायदेशीर अधिकार मिळावा, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
याशिवाय, पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच बनावट/निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करावा, असेही पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.