शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक दे ‘धक्का’; विधानसभा लढवलेले राहुल मोटे अजित पवारांसोबत

धाराशिव : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी सक्रीयपणे प्रचार केला होता, विशेष म्हणजे शिवसेना महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे समजते. त्यामुळे, धाराशिवमधून शरद पवार गटासह मविआला हा मोठा धक्का मानला जातो.

शरद पवारांची साथ सोडत माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार आहेत. लवकरच मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल मोटे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा मिळाला असून राहुल मोटेंनी मतदारसंघासह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. परंडा मतदारसंघातून राहुल मोटेंनी पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात, सलग तीन वेळा ते आमदार राहिले आहेत. दरम्यान, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंताकडून दीड हजारांच्या फरकाने मोटेंचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ते राजकारणात सक्रीय झाले असून सत्ताधारी महायुतीची वाट त्यांनी धरली आहे. राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशाने धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार आहे.

तानाजी सावंत यांच्याविरुद्ध न्यायालयात

विधानसभा 2024 च्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राहुल मोटे मैदानात होते. परंडा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत तानाजी सावंत विजयी झाले होते. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव केला होता.  मात्र, या विजयानंतर तानाजी सावंत यांच्या विजयावर आक्षेप घेत राहुल मोटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तानाजी सावंत यांनी मतदारांना साडी, भांडी, पैसे वाटप केले आहे, याचे पुरावेही जोडले आहेत. याबाबत तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीसही बजावली.

हेही वाचा

वीस वर्षांनी जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना ‘मनसे’ कानमंत्र!

आणखी वाचा

Comments are closed.