मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, असा पक्ष संपत नसतो, पुन्हा उभारी घेईल : शरद पवार
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापूरचे माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया ह्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कामगार चळवळ आणि सहकार क्षेत्रातील योगदानाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यानंतर शरद पवार यांनी येथे ‘दुभंगलेला समाज, बिहार निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, बेरोजगारी आणि काँग्रेस हा न संपणारा पक्ष आणि विचार’ या मुद्यांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस हा न संपणारा पक्ष आहे.
Sharad Pawar on Congress : काँग्रेस संपणार नाही : शरद पवार
शरद पवार यांनी सोलापूर हे सामाजिक प्रश्नावर एका व्यापक विचारानं पुढे जाणारं शहर आहे, असं म्हटलं. अलीकडे काही शक्ती जातीधर्मामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करून देशाच्या ऐक्यावर आघात करत आहेत, पण सोलापूर सामाजिक एकवाक्यता आणि एकता ह्यात तडजोड करत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
बिहार विधानसभा निकालाबाबत आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र, लागलेला निकाल स्वीकारायचा असतो. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते. याचे काही परिणाम होतात की नाही हे लोकांनी ठरवावे. दहा हजार दिले तेच सत्ताधाऱ्यांच्या विजयाचं कारण असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल,असंही शरद पवार म्हणाले.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी निवडणुकांआधी 10 हजार रु. थेट खात्यात देणं हेच सत्ताधाऱ्यांच्या यशाचं सूत्र असेल तर आम्हा विरोधी पक्षांना त्या तंत्राबद्दल चर्चा करावी लागेल. येत्या संसदीय अधिवेशनादरम्यान दिल्लीत सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत आणि काहीतरी ठोस धोरण ठरवावं असा विचार माझ्या मनात आहे,असं शरद पवार यांनी सांगितलं.
भाजप सोडून सर्वांसोबत युती आघाडी शक्य
स्थानिक पातळी आम्ही महापालिका निवडणुकांमध्ये लक्ष घालतो पण नगरपालिका, नगर पंचायतीत आम्ही स्थानिक नेतृत्वांना निर्णयाचे अधिकार देत असतो. त्यानुसार स्थानिक राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहून काही पक्ष एकत्र येत असतात पण ते एकत्र येताना भाजपाला सोडून काही पक्ष एकत्र येत असतील तर ते योग्यच आहे, असं शरद पवार म्हणाले.
ते पत्र म्हणजे बेरोजगारीचा दुष्परिणाम
लग्न होत नाही म्हणून मला एका तरुणाचं पत्र आलं होतं त्याबद्दल माध्यमांमध्ये खमंग चर्चा झाली पण एक गोष्ट खरी आहे की, अनेक ठिकाणी बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगारीचा दुष्परिणाम तरुण पिढीच्या आयुष्यावरही होतोय,असं शरद पवार म्हणाले.
काँग्रेस संपणार नाही
महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झालेला. संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला होता.त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं पण पक्ष असे संपत नसतात. चढ उतार असतो, पुन्हा एकदा उभारी घेईल. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस कधीही संपणारी नाही. गांधी-नेहरू ह्यांचा विचार स्वीकारलेली ही काँग्रेस देशात पुन्हा एकदा वेगळ्या स्थितीला पोहोचल्याचं आपण पाहू, असं शरद पवार म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.