ईडीबाबतची ‘ती’ भीती खरी ठरली, पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावरच झाली : शरद पवार
मुंबई : शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ईडीला देण्यात आलेल्या अधिकारांबद्दल भाष्य केलं. ईडीनं यूपीए आणि एनडीए सरकारच्या काळात केलेल्या कारवाया याची आकडेवारी शरद पवार यांनी सांगितली. पुढं जनतेनं महाराष्ट्र आणि देशात परिवर्तन केलं तर या संदर्भातील बदल करावा लागेल,असं शरद पवार म्हणाले. यूपीए सरकारच्या काळात पी.चिदंबरम यांनी जो प्रस्ताव आणला होता त्याला विरोध केला होता पण ऐकलं गेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. सरकार गेलं आणि त्यानंतर पहिली कारवाई पी. चिदंबरम यांच्यावर झाल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.
शरद पवार म्हणाले हे पुस्तक प्रसिद्ध होणार हे दोन दिवस वाचतो आहोत, टीव्हीवर पाहत आहोत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक कसं समजलं माहिती नाही. प्रचंड टीका पुस्तकावर आणि संजय राऊतांवर केली गेली. कुणी सांगितलं मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काय सांगितलं, अनेक माणसं बोलली आहेत.हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यातून माहिती येते ती बघितल्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
चिदंबरम यांच्यावरच पहिली कारवाई
शरद पवार यांनी पुढं ईडी संदर्भात भाष्य केलं ते म्हणाले, ईडी ही जी यंत्रणा आहे, कशी वागते याचं उत्तम लिखाण पुस्तकात आहे. मला आठवतं केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. चिदंबरम सहकारी होते, कायद्यात कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणला, तो वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंगांना सांगितलं हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे,आपण करता कामा नये, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. ज्याला अटक केलीय त्यानं स्वत: गुन्हा केला नाही हे सिद्ध करावं अशी तरतूद कायद्यात प्रस्तावित केली गेलेली. मी स्वत: विरोध केला, हे करु नका, उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागे हे सांगितलं, ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावर करण्यात आली. विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सारख्याला होती ती खरी ठरली, असं शरद पवार म्हणाले.
देशातील विरोधी पक्षांना उद्धवस्त करण्याचा निकाल केला गेला
हे काही लिखाण केले गेलं आहे, याच्यात राऊतांनी दोन राजवटींचा उल्लेख केला आहे. यूपीए आणि एनडीएच्या काळाचा उल्लेख आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. एनडीएच्या काळात 19 जणांवर कारवाई केली, यूपीएच्या काळात 9 लोकांवर आरोपपत्र दिलं, अटक कुणालाही केली गेली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बिजू जनता दल, डीएमके, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णाद्रमुक, मनसे, टीआरएस एवढ्या पक्षांच्या नेत्यांवर चौकश्या करुन केसेस करण्यात आल्या. याचा अर्थ देशातील विरोधी पक्ष उद्धवस्त करण्याचा निकाल या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आला. मी एवढाच विचार करतो हे पुस्तक वाचल्यानंतर कधी महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल. मुलभूत सामान्य माणसाचा राजकीय पक्षाचा जो अधिकार या ईडी कायद्याच्या उद्धवस्त करायचा जी तरतूद झालीय ते बदलावं लागेल. त्यासाठी जे काय करावं लागेल त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
हे पुस्तक जे कुणी वाचतील, राज्यकर्ते कुणी असतील त्यांनी गांभीर्यानं पाहायची गरज आहे. राज्य येतं जातं, निवडणुका जिंकतात हरतात, पण न्यायव्यवस्था लोकांच्या समोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडी सारख्या शक्तींच्या हातात दिल्यानं इच्छा असून देखील मर्यादा असतील तर ती बदलाची आवश्यकता आहे याची खात्री आपल्याला आहे. राऊतांनी हे पुस्तक लिहून मोठं काम केलं. पुस्तक निर्मिती करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याची आपली जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=yzffht1q8os
अधिक पाहा..
Comments are closed.