विधानसभेपूर्वी 2 लोक भेटले, 160 जागांची गॅरंटी दिलेली,शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी भेट घेतली होती त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती. निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं, असं शरद पवार म्हणाले. त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती. आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचं ठरवलं त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.  मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ. नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला आहे.  दोन व्यक्ती पवार साहेब यांच्याकडे गेले होते, 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगतील होतं (ऑफर दिली होती). मतदार यादीत धांदलीसाठी ते दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आले होते. पवारानी त्यांना दाद दिली नाही, असे होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

प्रविण दरेकर यांनी हे दावे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद दावे आहेत. शरद पवार यांच्या सारख्या नेत्यानं अशा प्रकारचे बाळबोध दावे करणं आश्चर्यकारक आहे. यामध्ये आपण दोन तीन गोष्टी निश्चित म्हणू शकतो. तुमच्याकडे माणसं आली होती तर तुम्हाला मॅनिप्युलेशन करायचं होतं का? तुम्ही त्या लोकांना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेला होतात, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का? बैल गेला अन् झोपा केला असं झालंय, असं प्रविण दरेकर म्हणाले. हतबलतेतून अशा प्रकारच्या गोष्टी पुढं येत आहेत, असा टोला देखील दरेकर यांनी लगावला.

https://www.youtube.com/watch?v=no-dmgrdjvm

आणखी वाचा

Comments are closed.