160 जागा जिंकून देण्याची ऑफर ज्यांनी दिलेली,शरद पवार यांना दिल्लीत भेटलेले ते दोन लोक कोण?

नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील त्रुटींचा पाढा वाचत मतचोरीचा आरोप केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पक्षाची मंडल यात्रा सुरु करण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर पूर्वी दोन लोक भेटले होते, अशी माहिती दिली. त्या दोन लोकांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दिली होती,मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. मात्र, ते दोन लोक नेमके कोण होते हा प्रश्न या निमित्तानं समोर आला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. कारण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.  मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. म्हणून असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा पाठिंबा मिळेल तसा मिळेल हा निर्णय घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष केलं, असं शरद पवार म्हणाले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जे मला माहिती आहे असं दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या, मतदार याद्या मॅनिप्युलेट करुन देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडणूक देऊ, तो त्यांनी 160 असा आकडा सांगितला होता, मला जे पवार साहेब माहिती आहेत त्याप्रमाणे त्यांचा यावर विश्वास बसला नाही, ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे, त्यांच्यानंतर त्यांनी हा विषय काय पुढं नेला नाही. दोन व्यक्ती आल्या होत्या, ते स्पष्टपणे जगासमोर, भारताला कळेल अशा शब्दात शरद पवार यांनी सांगितलं आहे. मतदारयाद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती, ती पार पवार साहेबांपर्यंत पोहोचली होती ती शरद पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार यांना भेटलेले ते दोघे कोण?

शरद पवार यांनी त्या दोन लोकांनी भेट दिलेल्या ऑफरची माहिती दिली मात्र ते दोघे कोण होते हे सांगितलं नाही त्यामुळं शरद पवारांना भेटलेले ते दोघे कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=es5lbvayy44

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.