शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाणप्रकरणी पंचाची साक्ष नोंदवली
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याप्रकरणी कल्याण कोर्टात खटला सुरू आहे. या खटल्यात आज कल्याण न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. घटनेच्या वेळी आरोपींच्या आवाजाचे करण्यात आलेले रेकॉर्डिंग तसेच त्यांचे आवाजाचे नमुने यांचा पंचनामा ज्या पंचासमक्ष करण्यात आला होता त्या पंचाची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.
न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयासमोर ही कार्यवाही झाली. आरोपी रमेश म्हात्रे आणि साधना कारंडे यांच्या आवाजाचे नमुने तसेच डॉ. वैभव साळुंखे यांनी रेकॉर्ड केलेल्या आवाजाचे नमुने पंचासमक्ष घेण्यात आले होते. या प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला होता. त्यासंदर्भात पंचाने न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदवली. साक्षीदरम्यान पंचाने आवाजाचे नमुने घेण्याची प्रक्रिया तसेच संबंधित रेकॉर्डिंग आणि पंचनाम्याबाबत न्यायालयाला माहिती दिली. पंचाची साक्ष नोंदवल्यानंतर आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी पंचाची उलटतपासणी केली.
Comments are closed.