शिमरन हेटमायरची तुफानी फलंदाजी! 45 चेंडूंत शतक ठोकत वैभव सूर्यवंशीचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड मोडीत

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून आला होता. पण या स्पर्धेत तो नावाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. आता वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. गयाना अॅमेजॉन वॉरियर्स आणि जमाईका किंग्समन या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान हेटमायरने 45 चेंडूंमध्ये 102 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 8 षटकार मारले. यादरम्यान त्याने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत त्याने एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने फलंदाजी करताना 22 सामन्यांमध्ये 86 षटकार खेचले आहेत. आता शिमरन हेटमायरने वैभवला मागे टाकत 51 सामन्यांमध्ये 87 षटकार खेचले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जर त्याला या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्याने एकाच वर्षांत 100 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला असता.
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावलं. हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतचं सर्वात वेगवान शतक ठरलं. या खेळीदरम्यान त्याने षटकारांचा पाऊस पाडला होता. अभिषेक शर्माने आतापर्यंत 96 षटकार खेचले आहेत. लवकरच तो 100 षटकारांचा पल्ला गाठू शकतो. अभिषेक शर्मा जपानविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-20 सामन्यात आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत तो 100 षटकारांचा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो.
यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा स्टार फलंदाज फिन अॅलन अव्वल स्थानी आहे. फिन अॅलनने आतापर्यंत 101 षटकार खेचले आहेत. तर निकोलस पूरन दुसऱ्या स्थानी आहे. निकोलस पूरनने आतापर्यंत 99 षटकार खेचले आहेत. तर अभिषेक शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने 96 षटकार खेचले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकल्टन या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचा कर्णधार मिचेल मार्श या यादीत पाचव्या स्थानी आहे. सध्या वैभव सू्र्यवंशी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानी पोहोचला आहे.
Comments are closed.