शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
अहिलीनगर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी (Shirdi) साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डीच्या साईनगरीत येत असतात. तन-मन-धन या भावनेनं साईचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांची स्थानिकांकडून लूट केली जाते. साईचरणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते. आता, याबाबत शिर्डीतील नगरपालिकेनं कारवाईलाा सुरुवात केली असून तीन दुकानांना टाळं ठोकण्यात आलंय. साईभक्तांना मूळ किमतीच्या अधिक किंमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे. दरम्यान, अहिल्यानगरचे (Ahilyanagar) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
साईभक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या लुटीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साईभक्त येत असतात, आणि साई मंदीरात दर्शनासाठी जातांना हार-प्रसादाच्या दुकानातून हार, फुलं, प्रसाद खरेदी करतात. मात्र, भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून, भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार, फुलं आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचं अनेकदा समोर आलंय. विशेष म्हणजे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने सील ठोकले असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.
ग्रामस्थांनी लूट करणाऱ्यांवर बहिष्कार घालावा
भक्तांच्या सुविधासाठी आपण अनेक निर्णय घेतो. भाविकांना हार, फुलं, प्रसाद योग्य भावात मिळावा यासाठी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीकडून स्टॉलदेखील उभारण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी देखील अशी लूट करणाऱ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे, आगामी काळात ज्या त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील. मी देखील स्थानिक आमदार असल्याने हे माझं कर्तव्य समजतो, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.