बबड्या, बबड्याचा बाबा आणि तीन मंत्र्यांवर कारवाई करा, ठाकरे गटाची राज्यपालांना विनंती, महाजनांच
शिवसेना यूबीटी: गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे. यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C P radhakrishnan) यांच्याकडे केली आहे. राजभवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्र्यांची यादीच जाहीर केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हनी ट्रॅपशी संबंधित असणाऱ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. ज्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यामध्ये प्रफुल लोढाची अटक झालेली आहे. मात्र, त्याच्याकडून अजून अनेक माहिती येणे बाकी आहे. कदाचित त्याच्या जीविताला सुद्धा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार सुरू आहे. ज्या डान्सबारवर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडली आहे, असा डान्सबार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृह राज्यमंत्री पदावर कसा राहू शकेल? तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी डान्सबार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावे डान्सबार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.
हनी ट्रॅपशी संबंधित पुरावे राज्यपालांना सादर
माणिकराव कोकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केली, तसेच विधिमंडळात रमी खेळले, हे अत्यंत वाईट आहे. त्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. हॉटेल व्हिट्स आणि करोडो रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ आणि सातत्याने उर्मटपणाचे वक्तव्य करणारे मंत्री संजय शिरसाट यांचे पायउतार होणे गरजेचे आहे. यासंदर्भात चर्चा झाली. योगेश कदम, संजय शिरसाट यांच्या बाबतचे अनेक कागदपत्र आणि पुरावे तसेच हनी ट्रॅपशी संबंधित काही पुरावे अनिल परब यांनी राज्यपाल यांना सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
महाजनांचं नाव दुसरं, पहिलं आणि तिसरं कोण?
तसेच मंत्री नितेश राणे, संदिपान भुमरे यांची तक्रार आम्ही केलेली आहे. संजय गायकवाड मारहाण प्रकरण, विधिमंडळातील झालेला गँगवॉरमुळे विधिमंडळाची अप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंवा आपण याबाबत मुख्यमंत्र्यांचे बोलावे, अशी मागणी केली यावर राज्यपालांनी मला या सर्व गोष्टी माहिती आहेत. निश्चितपणे महाराष्ट्रातील गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझे देखील कर्तव्य आहे. मी या संदर्भाने मुख्यमंत्र्यांची यावर चर्चा करेल, असे म्हटल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. 1. योगेश कदम, 2. गिरीश महाजन, 3. संजय शिरसाट, 4. माणिकराव कोकाटे, 5. नितेश राणे या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संदिपान भुमरे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर निशाणा
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली. मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरू नकोस, असे त्यांनी म्हटले. असे विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या की, योगेश कदम यांची पाठराखण करत असताना मी पाहिले की त्यांच्या वडिलांनी देखील त्यांची पाठराखण केली. पण मी समजू शकते की, आपला तो बबड्या असतो. त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की, आपला बबड्या वाचला पाहिजे. पण बबड्या आणि बबड्याच्या बाबाने जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणारे शिंदे यांच्याकडे केली आहे. तर शिंदे साहेब देखील हे जाणतात की, या राज्यामध्ये डान्सबार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली आणि गृहराज्यमंत्री पदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवला होता. मात्र आता बबड्या आणि बबड्याचा बाबा याचे जे काही चालले आहे, त्यामुळे या दोघांची गच्छंती होणे अत्यंत गरजेचे आहे. मला खात्री आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या संदर्भात नक्कीच गांभीर्याने चर्चा करतील, असे म्हणत त्यांनी योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.
https://www.youtube.com/watch?v=ieqohqj6gu4
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.