डफ कडाडला…शाहीरांचा बुलंद आवाज घुमला! शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘जाणिवोत्सव’
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेने दक्षिण मुंबईत ‘जाणिवोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवाची शानदार सुरुवात सोमवारी शाहिरी महोत्सवाने झाली. यानिमित्ताने लालबाग येथील गरमखाडा मैदानात डफ कडाडला आणि शाहीरांचा बुलंद आवाज घुमला. त्याला उपस्थितांचा दमदार प्रतिसाद लाभला. शाहिरी जागराने वातावरण भारून गेले.
शिवसेना नेते, खासदार व जाणीव ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून ‘जाणिवोत्सव’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 4 मे 2026 ते 23 जानेवारी 2027 पर्यंत हा सोहळा चालणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचा शुभारंभ सोमवारी गरमखाडा मैदानातून झाला. शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ‘महोत्सव शाहीरांचा’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यानंतर मराठी माणसाच्या उद्धारासाठी झालेला शिवसेनेचा झंझावात, या दोन्ही प्रसंगी शाहीरांचे योगदान मोठे आहे. समाजात केवळ जागृती नाही तर मराठी माणसाच्या मनात शौर्याची, स्वाभिमानाची, एकतेचे जाणीव निर्माण केली. समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या शाहीरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अप्रतिम पोवाडा सादर केला. शाहीर प्रवीण जाधव, नाशिक आणि शाहीर रामलिंग जाधव मुंबई या शाहिरी कलापथकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी ज्येष्ठ शाहिरी संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ शाहीर दत्ता ठुले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रासाठी शाहीरांचे मोठे योगदान – संजय राऊत
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीरांचे काम मोठे होते. दगडालाही जिवंत करेल, अशी शाहिरी पोवाड्यांची ताकद आहे. शाहीरांची परंपरा मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि शिवसेनेला फार मोठे योगदान देऊन गेली आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले. शाहीर अमरशेख, शाहीर जैनु चांद, शाहीर साबळे, शाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेक शाहीर मुंबईपासून दिल्लीपर्यंत डफ घेऊन शाहिरी पोवाडय़ाने महाराष्ट्राला जागवत होते. शिवसेनेच्या जन्मानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा विचार नेण्याचे काम शिवसेनाप्रमुखांबरोबर असणाऱ्या अनेक शाहीरांनी केले. शाहीर बालकराम वरळीकर, शाहीर साबळे आणि शाहीर दादा कोंडके याच भागातील होते, असे संजय राऊत म्हणाले. ज्येष्ठ शाहीर दत्ता ठुले यांना संजय राऊत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, उपनेते, आमदार मनोज जामसुतकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर, नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.
Comments are closed.