Ratnagiri News – एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी महामंडळाने लागू केलेला ‘स्वच्छता अधिभार’, भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. हा अन्यायकारक स्वच्छता अधिभार रद्द करावा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आज एसटी प्रशासनाला आंदोलन करण्याचा कडक इशारा दिला आला.

युवासेना जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत आणि पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी एसटी विभागाला मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात प्रत्येक तिकिटावर २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. बसस्थानके स्वच्छ ठेवणे ही महामंडळाची जबाबदारी असून त्याचा आर्थिक भार प्रवाशांवर लादणे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. १५ एप्रिलपासून लागू झालेल्या दरवाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासावर गदा आली आहे. ही सवलत कोणतीही अट न ठेवता पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. १० टक्के भाडेवाढ करूनही स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी नाही, बसेसची अवस्था दयनीय आहे आणि गाड्या वेळेवर सुटत नाहीत. सुविधा नसताना केवळ दरवाढ करणे म्हणजे सर्वसामान्यांची लूट असल्याची टीका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे.

प्रशासनाने या सर्व मागण्यांची दखल न घेतल्यास प्रवाशांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा जिल्हा युवासेना युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी दिला आहे. यावेळी तालुकायुवाधिकारी संदेश नारगुडे, उपतालुकायुवाधिकारी रितेश लोखंडे व अन्य शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित होते.

Comments are closed.