कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातली नेते आणि आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad) यांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत. सावकाराकडून आदिवासी बांधवांना, महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे ते स्वत: आमदार आहेत, राज्यात त्यांचे सरकार आहे, गृहमंत्री त्यांचे आहेत तरीही एका सावकाराविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्या सावकाराने चक्क कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच, काल परवा सावकाराने एका 12 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा हैदोस वाढला आहे, असे आ. संजय गायकवाड यांनी परिषद घेऊन सांगितले.
राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर व गोरगरिबांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येतात. अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सावकार आपली पोळी भाजत असतात. त्यामुळे, अवैध सावकारकीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही, किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात नाही. मात्र, आता चक्क आमदार महोदयांनीच सावकारकाविरुद्ध दंड थोपटले आहेत. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या बायकांवर, त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
सावकारकीच्या कायद्याचा गैरवापर करुन हे हौदोस घालत आहेत. आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ. या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांच्या शेती हडप करत आहेत. जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो, अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी. याबाबत मी विधासभेत आवाज उठवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ह उप मुख्यमंत्री याना विनंती आहे की, या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचे नाव घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा
मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
आणखी वाचा
Comments are closed.