रेल्वे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात;खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार


नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रेल्वेच्या (Railway) समस्यांसाठी तीन पक्षांचे खासदार एकत्र आल्याचा योगायोग पाहायला मिळाला. त्यामुळे, रेल्वे प्रवाशांसाठी ठाकरेंची शिवसेना (Shivsena) शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदाराची ही अनोखी युती पाहायला मिळाली. दिल्लीत आज रेल्वे कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांनी आवाज उठवला असून रेल्वेच्या प्रश्नासंदर्भाने रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. खासदार संजय दीना पाटील, खा. नरेश म्हस्के आणि बाळ्यामामा म्हात्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संयुक्तपणे निवेदन देत रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

रेल्वेचे अधिकारी त्यांच्या जबाबदारीवर धरून काम करीत नाहीत, मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रत्यक्ष रेल्वे स्थानकात, ट्रॅकवर उतरून काम करत नाहीत, खासदारांना कुठलीही माहिती देत नाहीत, असे या खासदार महोदयांनी आपल्या पत्रात म्हटले. तसेच, जनता मात्र रेल्वेच्या समस्यांबाबत खासदारांना दोषी ठरवते, असे म्हणत खासदारांनी अश्विनी वैष्णव यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. या कमिटीचे अध्यक्ष स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक झाली. ट्रेनमध्ये शौचालय चांगले नसतात, आतमधल्या सुविधा वाईट असतात. रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड असुविधेला सामोरे जावे लागते अश्या अनेक समस्या महाराष्ट्रातील खासदारांनी रेल्वेमंत्र्यांपुढे मांडल्या.

कोट्यवधी प्रवाशी, सुविधांचा अभाव

दरम्यान, देशभरात कोट्यवधी प्रवासी दररोज भारतीय रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वेचं जाळं हे जगातील सर्वाधिक मोठं रेल्वे जाळं असल्याचं सांगितलं जात. त्यामुळेच, या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून रेल्वे प्रशासनावर मोठा ताणही आहे. मात्र, रेल्वेकडून प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांवरुन नेहमीच नाराजी व्यक्त होत असते. रेल्वेचं तिकीट आरक्षण न मिळणे, स्वच्छता नसणे, मोठी गर्दी हीच प्रमुख कारणे असून प्रवाशांना या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे, भारतीय रेल्वेतून प्रवाशी मोकळा श्वास कधी घेणार हाही प्रश्न आहे. उत्तरेतून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यात मुंबईतील लोकलमधून दररोज 72 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे, प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छता ही कळीचा मुद्दा आहे. मात्र, अनेकदा रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयातच बसून असतात, खासदारांनाही महत्त्व देत नाहीत. त्यामुळे, महाराष्ट्रातील खासदारांनी रेल्वेमंत्र्यांच्या कानावर आपलं म्हणणं मांडलं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?

आणखी वाचा

Comments are closed.