गद्दारांनो ठाकरे कधी संपत नसतात…, ठाकरेंच्या मेळाव्यासाठी आलेले शिवसैनिक प्रचंड संतापले

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिन मेळाव्याचं मुंबईतील षण्मुखांनंद सभागृहात करण्यात आलं आहे. या मेळाव्याला जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षातील खासदारांच्या फुटीवर तीव्र भावना व्यक्त केल्या.

ओमराजेंचा प्रचार केला, हिशोब चुकता करणार

सांगलीहून आलेले तालुकाप्रमुख म्हणाले की, आम्ही 60 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी सांगलीहून आलो आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी आलोय. पन्नास खोके घेऊन एवढी मोठी गद्दारी केलीय त्यांना किंमत मोजावी लागणार आहे.  2029 ला हे खासदार म्हणून साधे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या लायकीचे नसणार, शिवसैनिक तालुक्यात घरोघरी जाऊन यांचा हिशोब चुकता करणार, असं सांगलीहून आलेल्या शिवसैनिकांनी म्हटलं. आम्हाला खासदार किती गेले याचा फरक पडत नाही. फक्त ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार आहे, असं सांगलीहून आलेल्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखानं म्हटलं.

ठाकरे म्हणजे नेते तयार करण्याची फॅक्टरी

शिवसेनेला 60 वर्ष झाली, 50-60 लोक गेल्यानं काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे डोंगरासारखे उभे आहेत. शिवसेनेवर संकटं आली तरी घाबरत नाही. शिवसैनिकांच्या मनात चीड झालीय ती येणाऱ्या काळात दिसेल. ज्याची लायकी नव्हती त्याला खासदार केलं, काँग्रेसमधून आलेला, घरात बसलेल्या माणसाला खासदार केलं, मुलगी नगरसेवक झाली, अशा शब्दात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं देखील शिवसैनिकानं म्हटलं.

षण्मुखानंद सभागृहाबाहेरील शिवसैनिकांनी देखील तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. आम्ही राजीनामे मागतोय, महागद्दारांना राजीनामा मागतोय, शिवसैनिक पेटून उठलाय, असं संतप्त शिवसैनिकानं म्हटलं. वाय सिक्युरिटी द्या किंवा कोणतीही सिक्युरिटी द्या, असा इशारा शिवसैनिकानं दिला. त्या शिवसैनिकाच्या हात एक बॅनर घेतला होता. त्या बॅनरवर गद्दारांनो ठाकरे कधी संपत नसतात. नेते तयार करण्याची कंपनी आहे. ठाकरे ब्रँड असं म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.