एकीकडे राज-फडणवीस भेट; दुसरीकडे नार्वेकरांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नेते मुख्यमंत्र्यांना भेटले
मुंबई : राज्यात महायुतीचं स्पष्ट बहुतमाने सरकार आल्यानंतरही महायुतीमध्ये (Mahayuti) तीन पक्षातील अंतर्गत नाराजी सातत्याने समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी नागपूरला असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने घेतलेल्या तीन निर्णयांना फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीवरूनही एकनाथ शिंदेंना हटविण्यात आल्याने राजकीय डावपेच माध्यमांत चर्चेत आहेत. त्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे (Uddhav Thackeray) तीन प्रमुख नेते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले होते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत या भेटीत बैठक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, स्मारकाच्या कामासंदर्भाने तीन महत्त्वाचे नेते भेटल्याने राजकीय तर्कवितर्कही लावले जात आहेत. तसेच, या भेटीतून काही राजकीय अर्थही काढले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले असून मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, मुंबईतील महापौर बंगल्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. त्यामध्ये इमारतीचे बांधकाम, स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी यासह अन्य कामे केली जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 180 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे, याच स्मारकाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते.
हेही वाचा
पांडवगडावर इंदापूरमधील गिर्यारोहकांवर मधमाशांचा शॉकींग स्ट्राईक; 2 बेशुद्ध, 4 जखमी
अधिक पाहा..
Comments are closed.