दक्षिण आफ्रिकेत गोळीबार, 12 ठार.
जोहान्सबर्ग येथील घटना : 9 जखमी : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील क्लीवलँडमध्ये एका अनधिकृत वसाहतीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत कमीतकमी 12 जणांना जीव गमवावा लागला असून अन्य 9 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा क्लीवलँडमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पोलीस विभागाने सांगितले आहे.
10 हून अधिक हल्लेखोरांनी एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा क्वांटम वाहनातून येत वसाहतीत बेछूट गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी वसाहतीत प्रवेश करण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला होता. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी वाहन काही अंतरावर सोडून देत पळ काढला आहे.
या भीषण हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत कुणालाच अटक केलेली नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अभियान सुरू केले आहे. तसेच या घटनेशी संबंधित माहिती पुरविण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने अधिक राहिले आहे. हा देश जगात सर्वाधिक हत्या होणाऱ्या देशांपैकी एक आहे.
Comments are closed.