अरे सिकंदर… आमच्या गंगावेश तालमीची अन् लाल मातीची अब्रू घालवली; वस्ताद संतापले, काय म्हणाले?
दीनानाथ सिंह सिकंदर शेख वर: अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला (Sikandar Shaikh Arrested) पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या नामांकित पैलवानावर गंभीर आरोप लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. पंजाब पोलिसांच्या तपासानुसार, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचं समोर आलं असून, याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
वस्ताद संतापले, काय काय म्हणाले?
या घटनेनंतर कुस्ती विश्वातील ज्येष्ठ पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “सिकंदर शेखने आमच्या गंगावेश तालमीची आणि लाल मातीची अब्रू घालवली. तो खरा महाराष्ट्र केसरी नाही. केवळ पैशासाठी अशा गोष्टी करणं म्हणजे कुस्ती या खेळाचा अपमान आहे. वस्तादाचं न ऐकणारा हा पैलवान आहे, त्याने कुस्तीचं नाव खराब केलं.”
दुसरीकडे, सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्यांना वाटतं की सिकंदरला या प्रकरणात फसवलं गेलंय आणि चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावलेत, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल? सिकंदरला शेकडो गडा, गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली. त्याला अशा प्रकारचं काही करण्याची गरजच नव्हती. हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो तयारी करत होता. त्याला खेळू न देण्यासाठी हे काही डावपेच तर नाहीत ना, हे मला समजत नाही.”
सिकंदर शेखचा प्रवास…
सध्या या प्रकरणाची तपासणी पंजाब पोलिस करत असून, कुस्ती विश्वात या घटनेमुळे संताप आणि निराशेचं वातावरण आहे. सिकंदर शेख मूळचा सोलापूरचा असला, तरी त्यानं कुस्तीचं घडण कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये घेतलं. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यानं दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला आणि घराघरात ओळख निर्माण केली. त्यानंतर क्रीडा कोट्यातून तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला होता, मात्र काही काळानंतर त्यानं नोकरी सोडली. पदवीधर असलेला सिकंदर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो शस्त्र पुरवठा साखळीतील मध्यस्थ म्हणून कार्यरत होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.