सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरासाठी 1 लाख रूपयांचा तुटपुंजा निधी, हिंदु जनजागृती समितीचा राज्य सरकारच्या धोरणावर टिका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी 55 वर्षांनंतर शासनाने वार्षिक निधी 3 हजारावरून 1 लाख रुपये इतका केला आहे. हा निधी तुटपुंजा असून सरकारने महिन्याला किमान 1 लाख रुपये खर्च म्हणून निधी दिला पाहिजे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
गोविंद भारद्वाज पुढे म्हणाले की, श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी वार्षिक निधी 3 हजाराहून 1 लाख रुपये करण्यासाठी सरकारला 55 वर्षे लागली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी वर्षाला 2 लाख 55 हजार 160 रुपये दिले जातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला वर्षाला 1 लाख रुपयांचा तुटपुंजा निधी दिला जातो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला. पुढे ते म्हणाले की, वर्षाला एक लाख रूपये म्हणजेच दररोज 274 रूपये. एका दिवसाच्या खर्चाचा विचार केला तर महाराजांच्या मूर्तीच्या नित्यपुजेसाठी फुले, मोठा हार, दिवाबत्ती, धूप, नारळ, पुजा आरती, प्रसाद, मूर्तीला वस्त्रालंकार, मंदिराची स्वच्छता, रोज मंदिरात नौकेने ये-जा करण्यासाठी प्रवासखर्च, मासिक खर्चात पुजाऱ्याचे वेतन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, मंदिराची रंगरंगोटी, डागडुजी शिवजयंती उत्सव आणि अन्य उत्सवाचा खर्च पहाता हा निधी अपुरा पडतो, असे भारद्वाज म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला निधी देताना दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे मयुर भितळे,जिल्हाध्यक्ष दिपेश वारंगे, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, सोहम खानविलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक संजय जोशी उपस्थित होते.
Comments are closed.