Singapore open badminton 2026 – पी.व्ही. सिंधू आणि सात्विक-चिराग जोडीची विजयी सुरुवात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी सिंगापूर इनडोअर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजयी सुरुवात केली आहे. या खेळाडूंनी आपापल्या सलामीच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारीत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत, 2022 मधील या स्पर्धेची विजेती असलेल्या पी.व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित पुत्री कुसुमा वारदानीवर 21-17, 21-18 अशी सलग गेममध्ये मात केली. या विजयामुळे या दोन्ही खेळाडूंमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड आता 3-3 असा बरोबरीत आला आहे. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीलाच 4 गुणांची आघाडी घेत वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, मध्यंतराच्या काळात वारदानीने मुसंडी मारल्यामुळे सिंधू थोडी पिछाडीवर पडली. मात्र, सिंधूने दमदार पुनरागमन करत 16-16 अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर सलग पाच गुण घेत पहिला गेम खिशात टाकला. दुसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली, पण सिंधूने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत सलग दोन गेममध्ये सामना संपवला. आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जपानच्या रिको गुंजीशी होणार आहे.

दुसरीकडे, पुरुष दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पहिल्या फेरीत चांगलाच घाम गाळावा लागला. चेन झी यी आणि प्रेस्ली स्मिथ या जोडीविरुद्धच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पहिल्या गेममध्ये हिंदुस्थानी जोडीने तब्बल सात गेम पॉईंट्स वाचवले, तरीही त्यांना हा गेम 26-28 असा गमवावा लागला. या धक्क्यातून सावरत सात्विक-चिराग जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले आणि तो 21-15 असा जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये या हिंदुस्थानी जोडीने सुरुवातीपासूनच पूर्ण वर्चस्व राखले आणि 21- 13 अशा फरकाने विजय मिळवला. 1 तास 15 मिनिटे चाललेल्या या थरारक लढतीतील विजयानंतर आता राउंड ऑफ 16 मध्ये या हिंदुस्थानी जोडीचा सामना चायनीज तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्याशी होईल.

पुरुष एकेरीमध्ये मात्र हिंदुस्थानच्या आयुष शेट्टीला पराभवाचा सामना करावा लागला. आयुषने व्हिक्टर लाईविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत पहिला गेम 21-11 असा सहज जिंकला होता. मात्र पुढील दोन गेममध्ये त्याला 14-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. याशिवाय स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोर्टवर उतरलेल्या इतर हिंदुस्थानी खेळाडूंचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

Comments are closed.