…तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले…

मुंबई : गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी लोकप्रिय प्रकार म्हणून गेल्या काही दिवसांपासून एसआयपीकडे पाहिलं जातं. एसआयपीद्वारे म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु आहे. या घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवर देखील होत असतो. एसआयपीद्वारे ज्यांनी म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलीय त्यांना नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळं गुंतवणूक करताना योग्य प्लॅनची निवड करणं आवश्यक आहे.

गुंतवणुकीच्या प्रवासाची सुरुवात करताना पहिला टप्पा एसआयपी म्हणजेच सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन हा मानला जातो. एसआयपीद्वारे थोडी थोडी रक्कम जमा करुन तज्ज्ञांकडून संशोधनाच्या आधारे योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. यातून त्यांना योग्य परतावा मिळत असतो.

गुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांकडून काही वेळा एसआयपी गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचं मानलं जातं. अनेकदा फंड मॅनेजर्स जे निर्णय घेतात ते चुकीचे ठरु शकतात. चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं केली गेलेली गुंतवणूक नुकसान करु शकते. यामुळं थेट इक्विटीमध्ये गुंतवणुकीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणं एकदम सुरक्षित आहे, असं मानलं जाऊ शकत नाही. यापूर्वी देखील एसआयपीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला होता.  त्यामुळं एसआयपीची गुंतवणूक कुठे होत आहे, कंपन्यांचं फंडामेंटल काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

आयसीआयसीआय प्रुटेन्शिअल म्यूच्युअलचे चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर एस नरेन यांच्या एसआयपीसंदर्भातील वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. चेन्नईत म्यूच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स  आणि इन्वेस्टमेंट मॅनेजर्सच्या बैठकीत त्यांनी एसआयपीच्या धोक्यासंदर्भात सतर्क केलं.  ते म्हणाले, जर कोणी लोकप्रिय एसआयपीद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असेल तर तो संकटात सापडेल.

शेअर बाजारात विक्रीचं सत्र सुरु असताना कमी किमतीवर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते. यापूर्वी 1994-2002 आणि 2006-2013 मध्ये एसआयपीधारकांना नुकसान सहन करावं लागलं होतं. त्या काळात मिडकॅपमधून रिटर्न मिळाले नव्हते. गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले होते.

टॉप इन्वेस्टमेंट सल्लागार नरेन यांनी महागड्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं  कमी जोखमीचं असेल, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या :

Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.