मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण.
6 नागा अपहृतांच्या हत्येमुळे संताप : मणिपूर बंदचे आवाहन
वृत्तसंस्था/कांगपोकपी
6 नागा अपहृतांच्या हत्येनंतर मणिपूर पुन्हा तणावाला सामोरे जात आहे. नागाबहुल भागांमध्ये जाळपोळ आणि तीव्र निदर्शने केली जात आहेत. तर मणिपूरच्या पर्वतीय भागांमध्ये चिंताजनक स्थिती पाहता अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्यात आले आहे. इम्फाळ पूर्वच्या ज्या रुग्णालयात 6 नागा लोकांचे मृतदेह ठेवण्यात आले होते, त्याच्या बाहेर हजारो लोक एकवटल्याने पोलिसांना अश्रूधूराचा वापर त्यांना पांगविण्यासाठी करावा लागला आहे. 13 मे रोजी मणिपूरच्या लेइलोन वाइफेई गावातून 6 नागा लोकांचे कुकी उग्रवाद्यांनी अपहरण केले होते. 6 नागा अपहृतांचे मृतदेह बुधवारी सुरक्षा दलांना आढळून आले आहेत. कुकी उग्रवाद्यांच्या विरोधातील अभियान रोखण्याचा निर्णय मागे घेतला जावा अशी मागणी करत नागा समुदायाने आता केली आहे.
24 तासांच्या बंदचे आवाहन
मणिपूरच्या नागा समुदायाची मुख्य संस्था युनायटेड नागा कौन्सिलने (यूएनसी) अपहृत 6 नागा लोकांचे मृतदेह मिळणे मानवाधिकारांचे सर्वात अस्वीकारार्ह आणि घोर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच यूएनसीने या घटनेच्या विरोधात मणिपूर बंदची हाक दिली आहे.
केएनएफ (पी) उग्रवाद्यांचा हात
या नागा लोकांचे अपहरण केएनएफ (पी) उग्रवाद्यांकडून करण्यात आले होते. नागा लोकांचे मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले आहेत. राज्य सरकारने सर्व कुकी उग्रवादी समुहांसोबतचा ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स करार रद्द करावा आणि नागा तसेच कुकी समुदायाच्या संघर्षादरम्यान 18 नागा लोकांच्या अपहरणारत सामील कुकी नॅशनल फ्रंट-प्रेसिडेंट ग्रूपच्या सर्व सदस्यांना त्वरित अटक करत खटला चालविण्यात यावा अशी मागणी यूएनसीने केली आहे. नागा समुदायाने नेमचा किपजेन यांना उपमुख्यमंत्री पदावरून त्वरित हटविण्याची मागणी देखील केली आहे.
कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री
मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी पीडित परिवारांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि या क्रूर घटनेची कठोर निंदा केली आहे. सरकार अशाप्रकारची क्रूर हिंसा सहन करणार नाही आणि या अत्याचारांना मूकदर्शक राहत पाहत बसणार नाही. हत्येसाठी जबाबदार दोषींना अटक केली जाईल आणि कायद्यानुसार शिक्षा केली जाणार असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
Comments are closed.